मुंबई उपनगरी रेल्वे सेवा स्वतंत्र करा, एलफिन्स्टन दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 06:52 PM2017-09-29T18:52:05+5:302017-09-29T18:52:15+5:30

एलफिन्स्टन रोड स्थानकाच्या पुलावर शुक्रवारी सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाची मुंबई उपनगरी सेवेबाबतची बेपर्वाई पुन्हा एकदा उघड झालीय. 

Separate Mumbai Suburban Railway Service, Shivsena's demand on the backdrop of Elphinstone Accident | मुंबई उपनगरी रेल्वे सेवा स्वतंत्र करा, एलफिन्स्टन दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मागणी

मुंबई उपनगरी रेल्वे सेवा स्वतंत्र करा, एलफिन्स्टन दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मागणी

googlenewsNext

मुंबई – एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या पुलावर शुक्रवारी सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाची मुंबई उपनगरी सेवेबाबतची बेपर्वाई पुन्हा एकदा उघड झालीय. रेल्वे मंत्रालयाला सर्वाधिक महसूल मिळवून देणारी मुंबई उपनगरी रेल्वे सेवा स्वतंत्र करा, स्थानिक अधिकाऱ्यांना अधिकार द्या आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्थापन झालेल्या काकोडकर समितीने केलेल्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करा, अशा मागण्या शिवसेनेने केल्या आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी केईएम रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, खासदार अरविंद सावंत, राहुल शेवाळे, आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे यांनीही रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

याप्रसंगी शिंदे यांनी काकोडकर समितीची अंमलबजावणी न झाल्याबद्दल तिखट शब्दांत नाराजी व्यक्त करत तातडीने या अहवालानुसार सुधारणा प्रकल्प हाती घेण्याची मागणी केली. देशभरातील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना करायच्या याचा अहवाल केंद्र शासनाला या समितीने सादर केला होता. २०१२ ते २०१७ या कालावधीत टप्प्याटप्प्याने करायच्या उपाययोजना त्यांनी सुचवल्या होत्या. त्यासाठी एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक होती. किमान आता तरी तातडीने या शिफारशींची अमलबजावणी करण्याची मागणी शिंदे यांनी केली.

केंद्रातील रेल्वेच्या अधिकाऱ्यांना मुंबईकर प्रवाशांच्या सुखदुःखाशी देणे-घेणे उरलेले नाही, अशीही टीका त्यांनी केली. मुंबईत दररोज सरासरी १५ प्रवासी मृत्युमुखी पडत आहेत. वर्षाला तीन ते चार हजार प्रवाशांचा नाहक बळी जात आहे. उपनगरी रेल्वे सेवेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याची गरज आहे. स्थानिक अधिकाऱ्यांना ते समजते, पण त्यांना काडीचाही अधिकार नाही. त्यामुळे रेल्वेला सर्वाधिक महसूल मिळवून देणारी मुंबई उपनगरी रेल्वे सेवा स्वतंत्र करा, अशी शिवसेनेची मागणी असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यासाठी पाठपुरावा केला जाईल.

शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि आमदार अजय चौधरी यांनी परळ-एलफिन्स्टन रोड पुलाच्या रुंदीकरणासाठी वारंवार रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता, मात्र त्यांची मागणी नेहमीच डावलण्यात आली, असेही शिंदे म्हणाले. रेल्वे मंत्रालय, मुंबईतले रेल्वेचे सर्व अधिकारी आणि राज्य सरकार यांची तातडीने उच्चस्तरीय बैठक घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे आपण मागणी करणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Separate Mumbai Suburban Railway Service, Shivsena's demand on the backdrop of Elphinstone Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.