शीना हत्याप्रकरणी आरोपनिश्चिती सप्टेंबरमध्ये
By Admin | Published: August 27, 2016 05:21 AM2016-08-27T05:21:29+5:302016-08-27T05:21:29+5:30
शीना बोरा हत्याप्रकरण गेल्यावर्षी उघडकीस येऊनही अद्याप खटला सुरू न झाल्याने विशेष सीबीआय न्यायालयाने आरोप निश्चितीसाठी युक्तिवादास सुरूवात करा, असे निर्देश शुक्रवारी दिले.
मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरण गेल्यावर्षी उघडकीस येऊनही अद्याप खटला सुरू न झाल्याने विशेष सीबीआय न्यायालयाने आरोप निश्चितीसाठी युक्तिवादास सुरूवात करा, असे निर्देश शुक्रवारी दिले. विशेष न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय यांच्या न्यायालयीन कोठडीत १३ सप्टेंबरपर्यंत वाढ केली. याच दिवशी सीबीआय केसला सुरुवात करण्याची शक्यता आहे. आरोपींचा अधिकार लक्षात घेता सरकारी वकीलांनी या दिवशी आरोप निश्चितीबाबत युक्तिवाद करावा, असे सीबीआय न्यायालयाचे न्या. एच. एस. महाजन यांनी म्हटले.
प्रसारमाध्यमे गुरुवारपासून सीबीआयच्या दोन साक्षीदारांमागे लागली आहेत, अशी तक्रारही सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली.ते कोणीही गांभीर्याने घेत नाही. आमच्याकडून टेपमधील संभाषणाची माहिती देण्यात आली नाही, असे न्यायालयाने सांगितल्यानंतर सीबीआयनेही त्यांच्याकडून टेपमधील संभाषणाबाबत गुप्तता बाळगण्यात आल्याचे न्यायालयाला सांगितले. पीटरच्या वकिलांनी साक्षीदारांचे संभाषण वृत्तवाहिन्यांवर प्रसारित केली जात असल्याने साक्षीदारांवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली. सीबीआयने आरोपपत्राला जोडलेली महत्त्वाची कागदपत्रे, साक्षीदारांची जबानी आणि अन्य कागदपत्रे यासंदर्भातील माहिती न्यायालयाच्या परवानगीशिवाय प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध करू नये, अशी मागणी करणारा अर्जही पीटरच्या वकिलांनी केला. या अर्जावर लवकरच सीबीआय उत्तर देईल. (प्रतिनिधी)