दीक्षांत समारंभाला सप्टेंबरचा मुहूर्त
By Admin | Published: June 5, 2014 01:02 AM2014-06-05T01:02:55+5:302014-06-05T01:02:55+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शंभराव्या दीक्षांत समारंभाला सप्टेंबर महिन्याचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. परीक्षा मंडळाच्या बैठकीत यासंबंधात हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहे.
नागपूर विद्यापीठ : माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम उपस्थित राहणार
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शंभराव्या दीक्षांत समारंभाला सप्टेंबर महिन्याचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. परीक्षा मंडळाच्या बैठकीत यासंबंधात हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहे. या समारंभास माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी उपस्थित राहण्यासाठी सिद्धांतता संमती दिली आहे. व्यवस्थापन परिषदेने अंतिम मान्यता दिल्यानंतर डॉ. कलाम यांना निमंत्रण पत्र पाठविण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी दिली.
विद्यापीठाचा शंभरावा दीक्षांत समारंभ गेल्या वर्षी १६ नोव्हेंबर रोजी होणार होता. परंतु एकही नियमित प्राध्यापक नसलेल्या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांंंचे अंतर्गत गुण नियमबाह्य पद्धतीने देण्यात आल्याने पदव्या वैध कशा, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यातच समारंभाचे मुख्य अतिथी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा नागपूर दौराच रद्द झाल्याने दीक्षांत समारंभ अनिश्चित काळासाठी समोर ढकलण्यात आला होता. त्यानंतर सातत्याने दीक्षांत समारंभ कधी होणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांंंकडून उपस्थित करण्यात येत आहे. यासंबंधात बुधवारी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यात परीक्षा मंडळाने २१, २२ व २३ सप्टेंबर या तारखा दीक्षांत समारंभाच्या आयोजनासाठी सुचवल्या आहेत. यातील कोणत्याही एका दिवशी दीक्षांत समारंभ घेण्यात येऊ शकतो. यासंबंधी पुढील आठवड्यात होणार्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर डॉ. कलाम यांना विद्यापीठातर्फे निमंत्रण पत्र पाठविण्यात येईल, असे अनुपकुमार यांनी सांगितले. १0 ते १२ सप्टेंबर दरम्यान ‘नॅक’ समिती विद्यापीठाची पाहणी करण्यासाठी येणार आहे. या समितीचा दौरा आटोपल्यानंतर दीक्षांत समारंभाची तयारी करण्यात येईल असेदेखील अनुपकुमार यांनी म्हटले. (प्रतिनिधी)