महामार्गावर अपघातांची मालिका
By Admin | Published: July 18, 2016 02:37 AM2016-07-18T02:37:57+5:302016-07-18T02:37:57+5:30
सायन - पनवेल महामार्गावर सानपाडा उड्डाणपुलाजवळ शनिवारी रात्री मिक्सर डंपरचा अपघात झाला.
नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावर सानपाडा उड्डाणपुलाजवळ शनिवारी रात्री मिक्सर डंपरचा अपघात झाला. विद्युतदिवे बंद असल्याने व परावर्तक पट्ट्याही नसल्यामुळे अपघात झाला आहे. महामार्ग रूंदीकरण करणाऱ्या ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे हे अपघात होत आहेत.
सानपाडा रेल्वे स्टेशनसमोर अपघात व वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नवीन उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. परंतु यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटण्यापेक्षा वाढला आहे. सानपाडा दत्तमंदिरकडून पुढे उड्डाणपूल असल्याचे सूचना फलक नाहीत. परावर्तक पट्टे, ब्लिंकर्सही बसविण्यात आले नाहीत. काही महिन्यांपासून येथील पथदिवे बंद आहेत. यामुळे रात्री वाहने उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून अपघात होत आहेत. शनिवारी रात्री साडेनऊ वाजता सिमेंट मिक्सरचा डंपर कठड्याला धडकून पलटी झाला. यामुळे वाशीकडे जाणारी वाहतूक काही वेळ ठप्प होती. सानपाडा पोलीस स्टेशन व तुर्भे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येवून वाहतूक सुरळीत केली.
सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे महामार्गावरील अपघात वाढत आहेत. भविष्यात गंभीर अपघात होवून जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शनिवारी अपघात झालेले वाहन रविवारी सायंकाळपर्यंत त्याच ठिकाणी उभे होते. यामुळे पुन्हा अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. मोठा अपघात झाला तर अपघातग्रस्त वाहने तत्काळ रोडवरून बाजूला नेवून उभी करण्याची यंत्रणा असली पाहिजे. परंतु याविषयी कोणतीही उपाययोजना केलेली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.