Vinayak Mete: विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूवरून शिवसेनेचे गंभीर आरोप, अरविंद सावंत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 03:08 PM2022-08-14T15:08:32+5:302022-08-14T15:09:50+5:30
Vinayak Mete Accident: मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांच्या आज पहाटे झालेल्या अपघाती निधनामुळे राज्यातील राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईत बैठकीसाठी येत असताना मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मेटेंचं निधन झालं.
मुंबई - मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांच्या आज पहाटे झालेल्या अपघाती निधनामुळे राज्यातील राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईत बैठकीसाठी येत असताना मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मेटेंचं निधन झालं. दरम्यान, विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूबाबत शिवसेनेने गंभीर शंका उपस्थित केली आहे. विनायक मेटे यांना बैठकीसाठी अचानक कुणी बोलावलं, याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.
अरविंद सावंत म्हणाले की, विनायक मेटेंचं अशा अपघाती निधन झाल्याची बातमी ऐकून अतिशय दु:ख झालं. शिवरायांचं अरबी समुद्रात स्मारक उभं करणे आणि मराठा आरक्षण या दोन विषयांसाठी विनायक मेटे हे सातत्य़ाने आग्रही होते. असा माणूस अचानक रात्री बीडवरून निघतो काय अपघात होतो काय, नवं सरकार आलं तेव्हा त्यांची चांगली वाईट काहीच प्रतिक्रिया आली नव्हती. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण गंभीर वाटतं. म्हणून मी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करतो. कोणी त्यांना बोलावलं, काय झालं, याची चौकशी व्हायला पाहिजे, असे अरविंद सावंत म्हणाले.
समोर आलेल्या माहितीनुसार आज होणाऱ्या एका बैठकीसाठी विनायक मेटे हे बीडवरून निघाले होते. त्यांची गाडी मुंबई-पुणे महामार्गावर असताना ती ट्रेलरला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात मेटे यांच्या गाडीच्या एका बाजूचा चेंदा मेंदा झाला. तसेच विनायक मेटे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यासोबत असलेले एक पोलीस कर्मचारीही जखमी झाले. तर मेटेंच्या ड्रायव्हरला किरकोळ जखमा झाल्या. दरम्यान, अपघातानंतर तासभर मदत न मिळाल्याचा आरोप विनायक मेटे यांच्या ड्रायव्हरने केला. गंभीर जखमी झालेल्या मेटे यांना रुग्णालयात दाखल केले असता तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.