अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीची गंभीर दखल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 02:40 PM2021-11-06T14:40:40+5:302021-11-06T14:42:04+5:30
Ahmadnagr District Hospital Fire: जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.
मुंबई - अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे. तसेच याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या आगीत १० जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.
काय आहे घटना?
जिल्हा सामान्य रुग्णालयातील ICU कोरोना कक्षाला आज सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. या आगीत होरपळून १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण ५० ते ८५ वयोगटातील आहेत. आयसीयू कक्षामध्ये कोरोनाची लागण झालेल्या २५ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान या कक्षाला सकाळी आग लागली आणि या आगीमध्ये हे सर्व रुग्ण गंभीर भाजले. त्यामध्ये सात जण सात जण अत्यंत गंभीर असून राहिलेल्या २० जणांना तातडीने इतर कक्षांमध्ये हलवण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन देण्याची कार्यवाही तातडीने सुरू झाली.पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आज दुपारी जिल्हा रुग्णालयाला भेट देणार आहेत. तर आरोग्य मंत्री राजेश टोपे रविवारी येणार नगरमध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
अग्निशमन दल, जिल्हाधिकारी कार्यालयाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा महापालिकेची यंत्रणा यांनी तातडीने घटनास्थळी धाव धाव घेतली आणि आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. आयसीयू रुग्ण भाजलेल्या अवस्थेत असताना त्यांना तातडीने इतर कक्षात हलवण्यात आलं आणि तातडीने त्यांना ऑक्सिजन व्हेंटिलेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली मात्र त्यातील काही रुग्ण अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.