पोटच्या गोळ्यांना केले 'सर्जा-राजा'
By admin | Published: July 8, 2016 05:51 PM2016-07-08T17:51:43+5:302016-07-08T17:51:43+5:30
अठराविश्व दारिद्र्य त्यात दरवर्षी नापिकी शेतीसाठी आर्थिक भांडवल नसल्यामुळे हतबल झालेला पळासखेडे (रुपनगर) येथील धारासिंग सरिचंद वंजारी यांनी आपल्या पोटच्या पोरांना सर्जाराजा बनवून
ऑनलाइन लोकमत
भडगाव, दि. ८ : अठराविश्व दारिद्र्य त्यात दरवर्षी नापिकी शेतीसाठी आर्थिक भांडवल नसल्यामुळे हतबल झालेला पळासखेडे (रुपनगर) येथील धारासिंग सरिचंद वंजारी यांनी आपल्या पोटच्या पोरांना सर्जाराजा बनवून शेतीची मशागत सुरू केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रुपनगर येथील अतिशय गरीब कुटुंबातील अल्पभुधारक शेतकरी धारासिंग वंजारी यांनी शेतीसाठी लागणारे आर्थिक भांडवल नसल्यामुळे मशागतीसाठी त्याने हे पाऊल उचलले आहे.
त्यांच्याकडे वडिलोपार्जीत तीन एकर शेती आहे. परंतु शेती हलक्या प्रतिची असल्यामुळे जो पैसा शेतीसाठी खर्च होतो तितके उत्पन्न निघत नाही. दरवर्षी पावसाचा लहरीपणामुळे शेतीत नापिकी होत आहे. शेतात भरघोस उत्पन्न यावे यासाठी त्यांनी कर्ज काढून विहीर खोदली, ठिबक केले परंतु विहिरीला पावसाअभावी मुबलक पाणी नाही. शेतीसाठी पैसा मोठ्या प्रमाणात लागतो ते भांडवल त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी आपल्या दोघा मुलांना सर्जा राजा बनवून शेती मशागत करण्याचे कष्टाचे तंत्र अवलंबले आहे.
शेतीची कामे सर्वत्र जोरात सुरू असल्याने बैल जोडीचेही कामाचे दरही वधारले आहेत. एका वेळी बैलजोडीने शेतीची मशागत करण्याचे ठरवले म्हणजे एक हजार रुपये रोज आहे व पिकांची निंदणी करण्याचा स्त्रियांचा एका दिवसाला दीडशे रुपये. एवढे भांडवल नसल्यामुळे त्यांची मुलं धनसिंग (इ.१०वी) व विशाल (इ.८ वी) हे दोन्ही शाळा बुडवून आपल्या वडिलांना शेती कामात मदत करतात. त्यांना पत्नी कमलबाई राबत आहे. ेमजुरी देण्यासाठी पैसे नसल्यामुळे आम्हाला हे सगळं करावे लागते, अशी माहिती या शेतकऱ्याकडून मिळाली.
शेतीसाठी बियाणेही उधारीने आणावे लागले. आता पुन्हा शेती मशागतीसाठी पैसे कुठून आणावेत हा प्रश्न होताच दुसऱ्याकडे मजुरी करुन घरच्या शेतीची कामेही ते करतात. मशागतीसाठी बैलजोडी मिळण्यास उशीर झाल्यास शेतात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असते. वेळेत मशागत केल्यास शेतात गवतही होत नाही आणि म्हणूनच पैशांची बचत करण्यासाठी या शेतकऱ्याने अपार कष्टाचे हे तंत्र नाईलाजाने स्वीकारले. यावर्षी सर्वत्र दुष्काळाचे सावट असल्यामुळे हाताला काम नाही. अशात शेतकऱ्याने हातात भांडवल नाही म्हणून हतबल न होता मेहनतीने शेतात सोनं पिकवू अशी जिद्द मनाशी बाळगली आहे.
कर्ज काढून विहीर खोदली, ठिबक केले, मुलीचेही लग्न केले. परंतु दरवर्षी शेतीसाठी जो खर्च होतो तोही निघत नाही. तर कर्ज कुठून फिटेल. या कर्जापायी गेल्या दोन वर्षापासून ही नवी शक्कल लढवली. पोटच्या गोळ्यांना औताला जुपतो व पूर्ण शेतीची मशागत करतो. यामुळे शेती मशागतीसाठी होणारा खर्च वाचतो व वेळेवर शेतीही तयार होते.
-धारासिंग सरीचंद वंजारी, रुपनगर पळासखेडे
अल्पभूधारक शेतकरी.