सर्पमित्रांकडून सापांना जीवदान
By admin | Published: August 23, 2016 01:35 AM2016-08-23T01:35:10+5:302016-08-23T01:35:10+5:30
निसर्गातील वाढत्या हस्तक्षेपामुळे जंगली प्राण्यांचा मानवी वस्तीकडे वावर वाढला आहे़
पिंपरी : निसर्गातील वाढत्या हस्तक्षेपामुळे जंगली प्राण्यांचा मानवी वस्तीकडे वावर वाढला आहे़ वन्यप्राण्यांबरोबर मोठ्या प्रमाणावर सापांचा वावर मानवी वस्तींमध्ये आढळून येत आहे़ गेल्या वर्षभरात वाइल्ड अॅनिमल अॅण्ड स्नेक प्रोटेक्शन सोसायटीच्या वतीने सुमारे ३३९३ सापांना जीवनदान दिले आहे़ तर ४३१ पशू-पक्ष्यांना निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आल्याची माहिती संतोष थोरात यांनी दिली़
हवामानातील बदलांमुळे अनेक साप मोकळ्या वातावरणात बाहेर पडतात़ हे साप प्रामुख्याने मानवी वस्तींमध्ये आढळून येतात़ अशा वेळी नागरिकांकडून त्यांना मारण्याचा प्रयत्न होतो़ परंतु, गेल्या १५ आॅगस्टपासून वर्षभरात वॅस्प्स संस्थेकडून सापांना आणि पशू-पक्ष्यांना वन विभागाच्या परिसरात मुक्त सोडण्यात आल्याची कामगिरी सर्पमित्रांच्या संघटनेने केली आहे़
पुण्याजवळील राजगड, ताम्हिणी घाट, सिंहगड, खानापूर, पानशेत, लोणावळा, भीमाशंकर, मुळशी परिसरातील सापांना आणि पशू-पक्ष्यांना सोडण्यात आले़
यामध्ये ९१३ नाग, ५७२ घोणस, २०४ मण्यार, २९ फुरसे, २३ चापडा आणि २ पोवळा अशा विषारी सापांचा समावेश आहे़ त्याचबरोबर ९९३ धामण, ५८७ तस्कर, १० अजगर १६९ दिवड, १४५ गवत्या, ९१ कवड्या, ६४ मांडूळ, ४७ धुळनागीण, २८ कु करी, ३६ नानेटी, १४ हरणटोळ, २१ डुरक्या घोणस, १७ मांजऱ्या, ९ चित्रांग नायकुळा, ५ रुका, ३ काळतोंड्या, २ पट्टेरी कवड्या, १ बेडोम मांजऱ्या, ७ रसेल कुकरी आणि १ विटकरी बुवा या बिनविषारी सापांचा समावेश
आहे़
या कामगिरीत गणेश भुतकर, शेखर जांभूळकर, उमेश तांबे, रमेश भिसे, प्रशांत पवार, ओमकार भूतकर, उमेश काकडे, विकास पवार यांच्यासह सुमारे १८० सर्पमित्रांनी सहभाग घेतला होता़ (प्रतिनिधी)
>उपचार : गारुड्यांकडून ४७ साप जप्त
>वन्यप्राण्यांमध्ये २ दुर्मीळ हरयाल राज्य पक्षी, ७ मोर, ६५ घार, ३३ घुबड, ९७ पोपट, ३९ पारवे, २५ कोकिळा, २३ साळुंकी, ११ बगळे, ७ धनेश, ११ शिक्रा, १७ बुलबुल, ८ भारद्वाज, ३३ कावळे, ५ गरुड या पक्ष्यांना जीवनदान देण्यात आले आहे़ तसेच ७ घोरपड, ९ हरीण, ६ मुंगुस, ५ माकड, २ शॉमिलिओन सरडा, ११ वटवाघूळ या प्राण्यांचा समावेश आहे़ यापैकी ५० पोपट आणि २ मुंगुस हे पुणे शहरातील घरांमध्ये आणि पेटशॉपमध्ये धाडी मारून जप्त केले़ तसेच नागपंचमी आणि इतर दिवशी गारुड्यांकडून जप्त केलेल्या ४७ सापांवर उपचार करून जगंलात सोडण्यात आले़