अंगणवाड्यांकरीता सेविका व समुपदेशक पदे
By Admin | Published: December 18, 2014 12:54 AM2014-12-18T00:54:01+5:302014-12-18T00:54:37+5:30
एकात्मिक बाल विकास सेवा योजना: राज्यातील २0 जिल्ह्यांना मिळणार लाभ.
वाशिम : एकात्मिक बाल विकास सेवा योजना बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेंतर्गंत देशातील निवडक जिल्ह्यांमधील अंगणवाडी केंद्रांमध्ये अतिरिक्त अंगणवाडी सेविका व पोषण समुपदेशक ही पदं निर्माण करण्यात आली आहेत. राज्यातील २0 जिल्ह्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
अतिरिक्त अंगणवाडी सेविका व पोषण समुपदेशक ही पदं मानधनावर असून, त्यासाठी तीन हजार रूपये मानधन निश्चित करण्यात आले आहे. राज्यातील २0 जिल्हयांमध्ये ही पदे भरताना दहावी उतीर्ण असलेल्या व दोन वर्ष सेवा झालेल्या मदतनीसांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास शासनाने काही अटींच्या अधिन राहून मान्यता दिली आहे. त्यामध्ये केंद्र व राज्याचा हिस्सा निश्चित केलेले मानधन देय राहील. या व्यतिरिक्त कोणतेही मानधन देण्यात येणार नाही. ही पदं केंद्र शासनाची मान्यता असेपर्यंतच कार्यरत राहतील. सेवासमाप्तीनंतर एक रकमी लाभ योजना या पदांना लागू राहणार नाही.
* निश्चित करण्यात आलेल्या मानधन खर्चात केंद्राचा हिस्सा ७५ टक्के व राज्याचा हिस्सा २५ टक्के आहे. यापूर्वीच्या अंगणवाडी सेविका, मदतनीसकरीता केंद्राचा हिस्सा ९0 टक्के व राज्याचा हिस्सा १0 टक्के होता. याव्यतिरिक्त या पदाकरीता अतिरिक्त मानधन देण्यात येणार नाही.