चौथ्या दिवशीही सर्व्हर डाऊन
By admin | Published: June 20, 2017 02:32 AM2017-06-20T02:32:32+5:302017-06-20T02:32:32+5:30
अकरावी आॅनलाइनचा पहिला टप्पा सुरळीत पार पडल्यानंतर शिक्षण विभागाच्या उपसंचालक कार्यालयाने नि:श्वास सोडला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी आॅनलाइनचा पहिला टप्पा सुरळीत पार पडल्यानंतर शिक्षण विभागाच्या उपसंचालक कार्यालयाने नि:श्वास सोडला होता. पण, अकरावी आॅनलाइन प्रवेशाचा महत्त्वाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यापासून सर्व्हर डाऊन होत असल्याने त्यांची चिंता वाढली आहे. गेल्या तीन दिवसांपासून उपसंचालक कार्यालयात पालक-विद्यार्थी खेटे मारत आहेत.
शुक्रवार, १६ जूनला दुपारी अकरावी आॅनलाइन प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी आॅनलाइन मार्गदर्शक पुस्तिका विकत घेऊन त्यातील युजर नेम आणि पासवर्डद्वारे अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात केली. पहिल्या अर्जात विद्यार्थ्याची प्राथमिक माहिती भरायची असते. जून महिन्याच्या सुरुवातीला या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अडचणी येत नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक खूश होते. शुक्रवारपासून सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यात शाळा आणि विद्यार्थ्यांना त्यांचे गुण, महाविद्यालये अशी माहिती भरायची होती. पण, शुक्रवारी ही प्रक्रिया सुरू झाल्यापासून मुंबई शहर आणि उपनगरातील शाळांमध्ये सर्व्हर डाऊनच होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला.
काही शाळांमध्ये सर्व्हर थोडा वेळ चालून बंद पडत होता. मानखुर्दमधील मतोश्री विद्यामंदिर, मालाड येथील महाराणी सईबाई विद्यामंदिर, कांदिवली येथील अनुदत्त विद्यालय आणि ज्ञानगंगा स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या शाळांमध्ये आॅनलाइन प्रवेशाचे काम सर्व्हर नीट चालत नसल्याने अत्यंत धिम्या गतीने चालू होते. तर दादर येथील बालमोहन विद्यामंदिर येथील काम ठप्प होते. चौथ्या दिवशी काम सुरू झाल्यावरदेखील तिथे काम सुरळीत सुरू झाले नाही. त्यामुळे एका विद्यार्थ्यासाठी बराच वेळ लागत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना मंगळवारी पुन्हा बोलवण्यात आले आहे.
अनेक पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेतस्थळावर लॉगइन होते. माहिती भरली जाते. पण, त्यानंतर ‘सर्व्हर डिसकनेक्टेड’ किंवा ‘सर्व्हर नॉट फाऊंड’ असा मेसेज येतो. त्यामुळे अनेक पालकांनी थेट उपसंचालक कार्यालयात धाव घेतली. तक्रारींचे फोन आले. पण, एकूणच पदरी निराशा पडली. उपसंचालक कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सर्व्हरचा प्रश्न उद्भवला होता. पण, दुपारपासून सर्व्हर सुरळीत सुरू असल्याचे सांगितले. कांदिवलीच्या एका शाळेकडून असे सांगण्यात आले की, आॅनलाइन प्रक्रिया सुरळीत चालू आहे. पण त्याच शाळेतील मुलांबरोबर संवाद साधला असता असे समजले की, सोमवारी सर्व्हर डाऊन असल्याकारणाने आॅनलाइन अर्ज भरला गेला नाही. त्यामुळे मंगळवारी विद्यार्थ्यांना शाळेत बोलवले आहे.