सर्व्हर डाऊनमुळे रजिस्ट्री पेंडिंग
By admin | Published: January 9, 2015 12:53 AM2015-01-09T00:53:06+5:302015-01-09T00:53:06+5:30
रेडिरेकनरमधील वाढीचा भुर्दंड टाळण्यासाठी वर्षाच्या शेवटी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी होणारी गर्दी, मध्येच येणाऱ्या शासकीय सुट्या व त्यातही आॅनलाईन नोंदणीचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे निबंधक
नागरिकांची गैरसोय : संपूर्ण रेडिरेकनर अपलोड नाही
नागपूर : रेडिरेकनरमधील वाढीचा भुर्दंड टाळण्यासाठी वर्षाच्या शेवटी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी होणारी गर्दी, मध्येच येणाऱ्या शासकीय सुट्या व त्यातही आॅनलाईन नोंदणीचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे निबंधक कार्यालयांमध्ये बहुतांश रजिस्ट्री ‘पेंडिंग’ आहेत. मालमत्तेच्या रजिस्ट्रीसाठी निबंधक कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांना तासन् तास वाट पाहून परतावे लागत आहे.
२८ डिसेंबरपासून आॅनलाईन सर्व्हर डाऊन झाले आहे. त्यामुळे प्रत्येक निबंधक कार्यालयात दररोज होणाऱ्या रजिस्ट्रीच्या तुलनेत फक्त १० टक्केच रजिस्ट्री होत आहेत. नोंदणीचे सर्व्हर मुंबईहून संचालित केले जाते. तेथूनच सर्व्हरची स्पीड कमी झाली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर काहीच करता येणार नाही, अशी हतबलता नोंदणी निबंधक व्यक्त करीत आहेत. नागपूर शहरातील निबंधक कार्यालयांमध्ये एरव्ही रजिस्ट्रीसाठी गर्दी असतेच. मात्र, हिवाळी अधिवेशनाच्या काळात रजिस्ट्रीचा ओघ कमी झाला. कागदपत्र अपूर्ण असतानाही ‘अॅडजेस्टमेंट’ करून रजिस्ट्री करणे या काळात बंद राहिले. त्यामुळे २४ डिसेंबरपर्यंत फार कमी रजिस्ट्री झाल्या. २५ डिसेंबरला ख्रिसमसची सुटी आली. २८ डिसेंबरला रविवारची सुटी आली. १ जानेवारीपासून वाढीव दराचे रेडिरेकनर लागू होते. याची माहिती असल्यामुळे मालमत्तेच्या खरेदी-विक्रीसाठी ३१ डिसेंबरपूर्वी मुद्रांक शुल्क भरण्यावर नागरिकांचा भर असतो. या वेळीही तसेच झाले. २६ व २७ डिसेंबर रोजी निबंधक कार्यालयात गर्दी उसळली. अशातच २७ डिसेंबर रोजी सर्व्हर ‘डाऊन’ झाले. २८ डिसेंबरलाही सर्व्हरची समस्या कायम राहिली.
ई.एम. नोटिंगसाठी लागतोय सरचार्ज
बँकेकडून कर्ज घेऊन एखादी मालमत्ता खरेदी केली असेल तर खरेदीच्या तारखेपासून एक महिन्यात संबंधित मालमत्तेचे दुय्यम निबंधकाकडे ‘इक्विटेबल मॉर्गेज नोटिंग’ करावे लागले. या मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर खरेदीदाराला मालमत्ता खरेदीसाठी लागलेल्या मुद्रांक शुल्काच्या एक टक्का रकमेचे चालान भरावे लागते. हा एकप्रकारे भुर्दंडच असतो. ज्या नागरिकांनी नोव्हेबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँक लोनवर मालमत्ता खरेदी केली ते आता ‘इक्विटेबल मॉर्गेज नोटिंग’साठी दुय्यम निबंधक कार्यालयात येत आहेत. मात्र, सर्व्हर डाऊन असल्यामुळे त्यांचे नोटिंगचे काम झालेले नाही. आता त्यांना रजिस्ट्रीच्या एक टक्का चालान भरावा लागणार आहे. सर्व्हर डाऊन असल्यामुळे नोटिंगचे काम रखडले आहे. त्यासाठी आम्ही भुर्दंड का भरायचा, असा प्रश्न संबंधित मालमत्ता धारकांनी उपस्थित केला आहे.
मुद्रांक शुल्क निश्चित करताना अडचणी
‘इयर एंडिंग’मुळे रजिस्ट्री करणाऱ्यांची, मुद्रांक शुल्क भरणाऱ्यांची संख्या वाढली व दुसरीकडे सर्व्हर डाऊन झाले. यामुळे रजिस्ट्रीचे वेटिंग वाढत गेले. नव वर्षात नवे रेडिरेकनर लागू झाले. पण संपूर्ण शहराचे नवे रेडिरेकनर पूर्णपणे अपलोड झाले नव्हते. त्यामुळे मुद्रांक शुल्क निश्चित करताना अडचणी आल्या.
या कारणास्तव पुन्हा वेटिंग वाढत गेले. ३ जानेवारीला काही प्रमाणात रजिस्ट्री करण्यात आल्या. ४ जानेवारीला पुन्हा रविवारची सुटी आली. ५ व ६ जानेवारी रोजी नागरिक रजिस्ट्रीसाठी पोहचले तेव्हा त्यांना खूप जास्त रजिस्ट्री आधीच पेंडिंग असल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेकांना दिवसभर वाट पाहून रजिस्ट्री न करताच परतावे लागले. ७ तारखेला दुपारनंतर सर्व्हरमध्ये पुन्हा तांत्रिक बिघाड आला.
आज, गुरुवारीही दिवसभर सर्व्हर डाऊन राहिले. त्यामुळे दररोजच्या तुलनेत १५ टक्केच रजिस्ट्री झाल्या. आजही अनेकांना परतावे लागले. उद्या, शुक्रवारीही हीच समस्या कायम राहिली तर नागरिकांना थेट सोमवारपर्यंत वाट पहावी लागेल. कारण, १० तारखेला आठवड्यातील दुसरा शनिवार व ११ तारखेला रविवार असल्यामुळे सुटी आहे. (प्रतिनिधी)