डबेवाल्यांची सेवा महाग
By admin | Published: July 19, 2015 02:13 AM2015-07-19T02:13:19+5:302015-07-19T02:13:19+5:30
गेली १२५हून अधिक वर्षे मुंबईच्या चाकरमान्यांचे डबे पोहोचविणाऱ्या डबेवाल्यांनीही आता प्रत्येक डब्यामागे १०० रुपये वाढविण्याचा निर्णय घेतला असून, ही भाववाढ लागू झालेली आहे.
मुंबई : गेली १२५हून अधिक वर्षे मुंबईच्या चाकरमान्यांचे डबे पोहोचविणाऱ्या डबेवाल्यांनीही आता प्रत्येक डब्यामागे १०० रुपये वाढविण्याचा निर्णय घेतला असून, ही भाववाढ लागू झालेली आहे. शिवाय, डब्यात पाण्याची अथवा ताकाची बाटली असल्यास अधिक पैसे मोजावे लागणार असल्याचा निर्णय मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळातर्फे घेण्यात आला आहे.
मुंबईत जवळपास ५ हजार डबेवाले दिवसाला दोन ते तीन लाख डबे पोहोचवितात. डबेवाल्यांना या सेवेव्यतिरिक्त इतर उत्पन्नाचे साधन नसल्याने महागाईची झळ पोहोचत आहे. त्यामुळे पूर्वी दरमहिना ७०० रुपये दर असलेल्या डब्याचे आता ८०० रुपये झाले असल्याचे मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले. तसेच डब्यात पाण्याची अथवा ताकाची बाटली असल्यास अधिकचे ५० रुपये आकारण्यात येतील असेही नमूद केले.
गेल्या काही वर्षांत मुंबईत अनेक उद्योगांनी डोके वर काढले. मात्र डबेवाल्यांच्या सेवेत खंड पडला नाही. गेल्या वर्षी केवळ २० ते ३० टक्के वाढ करण्यात आली होती, परंतु मुंबईसारख्या शहरात डबेवाल्यांना एवढ्या कमी उत्पनात भागविणे कठीण जात आहे. त्यामुळे ही वाढ करण्यात आली असून, कुरिअरच्या सेवेपेक्षाही हे दर कमी आहेत, असे तळेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)