सर्व्हिस चार्ज ऐच्छिकच!
By admin | Published: January 19, 2017 02:39 AM2017-01-19T02:39:43+5:302017-01-19T02:39:43+5:30
सर्व्हिस चार्ज आणि सर्व्हिस टॅक्स या दोन भिन्न गोष्टी आहेत, हे ग्राहकांनी लक्षात घेतले पाहिजे.
सर्व्हिस चार्ज आणि सर्व्हिस टॅक्स या दोन भिन्न गोष्टी आहेत, हे ग्राहकांनी लक्षात घेतले पाहिजे. अनेकदा नावात गल्लत होते. सर्व्हिस टॅक्स हा सरकारी नियमानुसार बिलावर आकारला जातो. पण सर्व्हिस चार्ज हा प्रत्येक हॉटेलमध्ये ग्राहकाला दिलेल्या सेवेसाठी आकारला जातो. हा चार्ज ग्राहकाला देणे ऐच्छिक आहे. एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर तिथली सेवा ग्राहकाला आवडली नाही तर तो सर्व्हिस चार्ज देणे नाकारू शकतो. पण हॉटेलच्या बिलामध्येच हा चार्ज आकारला जात असल्यामुळे ग्राहकाला हा चार्ज नाकारणे कठीण जाते.
हॉटेल्सना सर्व्हिस चार्ज आकारायचा असल्यास त्यांनी ग्राहकाला याची स्पष्ट कल्पना देणे गरजेचे आहे. पण असे होत नाही. यावर उपाय म्हणजे हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळच दिसेल अशा ठिकाणी फलक लावणे अपेक्षित आहे. या फलकावर हॉटेल मालकाने आकारण्यात येणारा सर्व्हिस चार्ज स्पष्टपणे नमूद केलेला पाहिजे. यामुळे ग्राहकाला निर्णय घेता येईल. त्याला हॉटेलने नमूद केलेला सर्व्हिस चार्ज द्यायचा नसल्यास तो त्या हॉटेलमध्ये जाणे टाळेल. हॉटेलमध्ये मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, कुटुंबीयांसमवेत गेल्यावर बिल अधिक आल्यास बिलावरून वाद घालणे योग्य दिसत नाही. त्यामुळे अनेकदा ग्राहक बिल काहीच न बोलता देऊन टाकतात. हॉटेलमध्ये वेटर आणि सुरक्षारक्षक एकत्र येऊन बोलू लागल्यास ग्राहकाला वाद घालणे कठीण जाते.
सेवा आवडल्यास पैसे देणे योग्य आहे. पण सेवा आवडली नसताना पैसे देणे बंधनकारक नाही. त्यामुळे ग्राहकांनी जागरूक होण्याची आवश्यकता आहे. हॉटेलमधले बिल तपासले पाहिजे. अथवा हॉटेलमध्ये गेल्यावर आधीच किती सर्व्हिस चार्ज आकारता हे विचारले पाहिजे.
(लेखक कन्झ्युमर गायडन्स सोसायटी आॅफ इंडियाचे मानद सचिव आहेत.)