सेवा, समर्पण व त्यागवृत्तीचा गौरव

By admin | Published: November 10, 2014 01:06 AM2014-11-10T01:06:02+5:302014-11-10T01:06:02+5:30

गत अनेक वर्षांपासून वैद्यकीय आणि सामाजिक सेवेने सर्वांच्या मनात जिव्हाळ्याचे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. विलास डांगरे यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने रविवारी

Service, dedication and pride of dedication | सेवा, समर्पण व त्यागवृत्तीचा गौरव

सेवा, समर्पण व त्यागवृत्तीचा गौरव

Next

षष्ठ्यब्दीपूर्ती समारंभ: विलास डांगरे यांचा सत्कार
नागपूर : गत अनेक वर्षांपासून वैद्यकीय आणि सामाजिक सेवेने सर्वांच्या मनात जिव्हाळ्याचे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. विलास डांगरे यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने रविवारी नागपूरकर जनतेने सेवा, समर्पण आणि त्याग वृत्तीचा सत्कार सोहळा अनुभवला.
डॉ. विलास डांगरे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त रविवारी देशपांडे सभागृहात त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला डॉक्टरांवर प्रेम करणाऱ्या जनतेने एकच गर्दी केली होती. जाहीर कार्यक्रम असला तरी त्याला कौटुंबिक स्वरूप यावे इतका जिव्हाळा या कार्यक्रमात होता. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपुष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि रामकृष्ण मिशनचे स्वामी ब्रह्मस्थानंद यांच्यासह व्यासपीठावर सत्कारमूर्ती डॉ. विलास डांगरे, महापौर प्रवीण दटके, सत्कार समितीचे कार्याध्यक्ष बनवारीलाल पुरोहित आणि सचिव संजय भेंडे उपस्थित होते.
सुरुवातीला चंद्रशेखर वऱ्हाडपांडे लिखित स्वागत गीत गिरीश वऱ्हाडपांडे व त्यांच्या चमूने सादर केले. आयुर्वेदिक महाविद्यालयांच्या विद्यार्थिंनीनी सादर केलेल्या धन्वतरी मंत्राने हा सोहळा अधिकच कौटुंबिक झाला.
प्रफुल्ल नंदनगिरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला मंत्रोच्चार व सुहासिनींकडून ओवाळून डॉ. विलास डांगरे यांचा डॉ. भागवत यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, सन्मानपत्र आणि धन्वतंरीची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांनी डॉक्टरांच्या सामाजिक सेवेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते विदर्भासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरव आहेत, असे प्रतिपादन या मान्यवरांनी केले. यावेळी स्वामी ब्रह्मस्थानंद व बनवारीलाल पुरोहित यांचेही भाषण झाले. सत्त्काराला उत्तर देताना डॉ. विलास डांगरे यांनी या पुढेही लोकांची सेवा करण्यासाठी आशीर्वाद द्या, असे भावपूर्ण आवाहन उपस्थितांना केले.
कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते. पण मुंबईतील कार्यव्यस्ततेमुळे ते येऊ शकले नाहीत, त्यांनी शुभेच्छा पाठविल्या आहेत, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले तर आभार प्रा. संजय भेंडे यांनी मानले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत मा.गो. उपाख्य बाबुराव वैद्य, लोकमत मीडिया लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा, माजी खासदार दत्ता मेघे, न्या. व्ही. एस. सिरपूरकर, प्रभाकरराव मुंडले, सदगुरुदास महाराज, नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त छोटू भोयर तसेच साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सुगंधा देशपांडे व त्यांच्या चमूने सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
डॉ. डांगरेंच्या जीवनापासून प्रेरणा घ्या - सरसंघचालक
डॉ. विलास डांगरे आपल्या पैकीच एक आहेत. मात्र ते करीत असलेल्या नि:स्वार्थी वैद्यकीय सेवेतून ते प्रत्येकाला आपलेसे वाटतात. त्यामुळेच त्यांचा सत्कार सोहळा मोठ्या कुटुंबातील सत्कार सोहळा वाटतो. डॉ. डांगरे यांना महापुरुषांचे सान्निध्य लाभल.े त्याचा त्यांना सामाजिक सेवेत लाभ झाला. चिंतन, क्रियाशिलता आणि हाताला यश हे सर्व गुण एकत्रित एका माणसात असणे ही दुर्मिळ बाब. पण डॉक्टरांकडे ते आहेत म्हणूनच त्यांना अलौकिकत्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या जीवनकार्यापासून समाजातील प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी व जीवन जगण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
लोकसेवेसाठी आशीर्वाद द्या - डॉ. विलास डांगरे
वयाची ६० वर्षे पूर्ण केली आहेत. मिळालेले आयुष्य बोनस आहे त्याचा वापर लोकसेवेसाठी व्हावा यासाठी आशीर्वाद द्या, असे भावपूर्ण प्रतिपादन सत्कारमूर्ती डॉ. विलास डांगरे केले. मी काही केले यासाठी हा सत्कार होत असेल तर तो मला आवडणार नाही. कारण मी माझ्या आनंदासाठी हे सर्व करतो. संघाचे संस्कार आणि स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या जीवनापासून मिळालेली प्रेरणा यातून आपल्या जीवनाची वाटचाल सुरू आहे. सामाजिक क्षेत्रात योगदान दिल्यावरच जीवन सार्थक ठरते याची खात्री पटल्यानेत त्या दिशेने काम सुरू केले. मी माणसात देव पाहणारा माणूस आहे. रुग्णाच्या समाधानातून मिळणारा आनंद हा अलौकिक असतो. पुढच्या काळातही अशीच सेवा घडावी, अशी माझी इच्छा आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रभूषण - गडकरी
डॉ. विलास डांगरे यांनी त्यांच्या समर्पित वैद्यकीय सेवेतून समाजकार्य केले. ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्रभूषण आहेत,असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. डॉक्टरांशी असलेल्या आपल्या मैत्रीचे अनेक किस्से सांगत गडकरी यांनी डांगरे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख यावेळी मांडला. डॉक्टरांची वैद्यकीय सेवा पैशासाठी नाही तर सामाजिक कार्यासाठी आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत बड्या राजकीय नेत्यांवर डांगरे यांनी उपचार केल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. आपल्या सेवेतून एक सामान्य माणूस असामान्य कसा होऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे डॉक्टरांचे जीवन असल्याचे गडकरी म्हणाले.
सभागृहाच्या बाहेर तिप्पट गर्दी
सभागृहातील आसन व्यवस्था आणि डॉक्टरांवर प्रेम करणारी जनता यांचे प्रमाण व्यस्त असल्याने आयोजकांनी देशपांडे सभागृहाच्या बाहेर दोन मोठे स्क्रीन लावून नागरिकांना बसण्याची व्यवस्था केली होती. मात्र तीही अपुरी पडावी इतकी गर्दी सत्कार सोहळ्याला झाली. कार्यक्रमाची वेळ ७ वाजताची असली तरी सायंकाळी ६ वाजताच सभागृह पूर्ण भरले होते. अनेक लोक कार्यक्रम सुरू झाल्यापासून तर संपेपर्यंत उभे होते. यात काही मान्यवरांचाही समावेश होता. यापेक्षा तिप्पट गर्दी ही सभागृहाच्या बाहेर होती. यावरून डॉ. डांगरे यांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावा.

Web Title: Service, dedication and pride of dedication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.