१०८ रुग्णवाहिका जीवनदायिनी; विनामूल्य सेवेला १० वर्षे पूर्ण

By दीपक भातुसे | Published: July 7, 2024 07:09 AM2024-07-07T07:09:59+5:302024-07-07T07:11:14+5:30

‘डायल १०८’ रुग्णवाहिकेची सेवा राज्यातील कोट्यवधी रुग्णांसाठी ही सेवा जीवनदायिनी ठरली

service of Dial 108 ambulance has become lifeline for crores of patients in the state | १०८ रुग्णवाहिका जीवनदायिनी; विनामूल्य सेवेला १० वर्षे पूर्ण

१०८ रुग्णवाहिका जीवनदायिनी; विनामूल्य सेवेला १० वर्षे पूर्ण

ग्रामीण आणि निमशहरी भागात रुग्णांना उपचारासाठी किंवा रुग्णालयात नेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. दुर्गम आदिवासी भागात तर रुग्णांचे सर्वाधिक हाल होत होते; मात्र महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस (एमईएमएस) या प्रकल्पांतर्गत २६ जानेवारी २०१४ रोजी राज्यात ‘डायल १०८’ रुग्णवाहिकेची सेवा सुरू झाली आणि राज्यातील कोट्यवधी रुग्णांसाठी ही सेवा जीवनदायिनी ठरली आहे. ही सेवा सुरू होऊन आता १० वर्षे पूर्ण झाली आहेत. कुणी आजारी असेल, अपघात झाला असेल किंवा तातडीच्या वैद्यकीय सेवेची गरज असेल तेव्हा १०८ रुग्णवाहिका विनामूल्य सेवेसाठी तत्पर असते. राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग व भारत विकास ग्रुपच्या (बीव्हीजी इंडिया) संयुक्त विद्यमाने ही सेवा मागील १० वर्षे राज्यात ठिकठिकाणी चालविण्यात येत आहे. या दहा वर्षांच्या कालावधीत राज्यात १०८ रुग्णवाहिकेमध्ये ४०,२१३ प्रसूती करण्यात आल्या आहेत. तसेच ४,०३४ रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवासाची (व्हेंटिलेटर) सुविधा देण्यात येऊन त्यांचे प्राण वाचविण्यात आले आणि रुग्णालयात हलवण्यात आले.

१,००,०३,४४६ रुग्णांना मिळाली सेवा

राज्यात कोणत्याही ठिकाणावरून मोबाईल अथवा दूरध्वनीवरून १०८ क्रमांक डायल करताच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना विनामूल्य आणि वेळेत रुग्णवाहिका सेवा देण्यात येते.
 
सेवा सुरू झाली तेव्हापासून जून २०२४ पर्यंत अपघाती घटनांमध्ये रुग्णवाहिकेमधून ५,२२,६८२ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविण्यात आले आहे. 

९७% रुग्णांकडून उत्कृष्ट अभिप्राय

या सेवेचा फायदा झालेल्या ९७% रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी प्रणालीसाठी उत्कृष्ट अभिप्राय दिला आहे. या सेवेला एसकेओसीएचद्वारे (सरकारमधील योगदानाची मान्यता देणारी संस्था) भारतातील सर्वोत्तम शासित प्रणाली म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. 

२०२३ मध्ये बीव्हीजी-एमईएमएसला दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट कार्यान्वित आणि व्यवस्थापित प्रकल्प म्हणून ‘द रॉयल इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड सर्वेअर्स’द्वारे सन्मानित करण्यात आले आहे. ३ ऑगस्ट २०२३ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात बीव्हीजी इंडिया लिमिटेडला या सेवेसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

जागतिक दर्जाच्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने एमईएमएस शोधनिबंधाची निवड केली आहे. ‘नेचर’, जे सर्वोत्तम वैज्ञानिक नियतकालिकांपैकी एक आहे, ज्यामध्ये एमईएमएसवर वैज्ञानिक अहवाल प्रकाशित झाला आहे.

राज्यात ९३७ रुग्णवाहिका

राज्यात सध्या अशा ९३७ रुग्णवाहिका असून सर्व रुग्णवाहिकेत पल्स ऑक्सिमीटर, मेडिकल ऑक्सिजन यंत्रणा सज्ज असते. ही देशातील अविरत २४ तास डॉक्टर व अत्यावश्यक वैद्यकीय सुविधेसह असणारी एकमेव यंत्रणा आहे.

नाशिक येथील महाकुंभमेळा कालावधीत १,०७,२०० रुग्णांना सेवा दिली असून पंढरपूरच्या वारीमध्ये २,८९,६४६ आणि गणपती उत्सवात ४,६८४ रुग्णांना सेवा दिली आहे. कोरोनाच्या कठीण काळातही ही सेवा जीवनदायी ठरली आहे.

रुग्णांना सेवा 

राज्यात १ कोटी ३ हजार ४४६ रुग्णांना सेवा मिळाली आहे 

२९,२५३
आगीच्या घटना  
७५,५९३
हृदयरोग  
१,५८,६४८
उंचावरून पडून जखमी  
२,३२,४२६
विषबाधा प्रकरण 
१६,५६,०९४ 
प्रसूतीवेळी सेवा 
६,९४९ 
शॉक किंवा वीज पडून जखमी 
 

Web Title: service of Dial 108 ambulance has become lifeline for crores of patients in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.