सेवा संरक्षण दलाची
By Admin | Published: April 30, 2017 02:35 AM2017-04-30T02:35:59+5:302017-04-30T02:35:59+5:30
संरक्षण दलाचे स्थलसेना (भूदल) नौदल व वायुसेना हे तीन विभाग आहेत. स्थलसेना हा भारतीय सैन्य दलाचा सर्वांत मोठा विभाग आहे. यात बढतीच्या, विकासाच्या
- प्रा. राजेंद्र चिंचोले
संरक्षण दलाचे स्थलसेना (भूदल) नौदल व वायुसेना हे तीन विभाग आहेत. स्थलसेना हा भारतीय सैन्य दलाचा सर्वांत मोठा विभाग आहे. यात बढतीच्या, विकासाच्या नेतृत्वगुणाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. नौदलात बंदराच्या ठिकाणी व समुद्रात नोकरी, स्पर्धात्मक वातावरण, आव्हान पेलण्याची क्षमता, सतत शिकण्याची गरज, कर्तृत्वाला वाव या संधी उपलब्ध आहेत. वायुसेनेत शहरी भागात नियुक्ती, निर्यातक्षमता, मानसिक क्षमता, जिज्ञासूवृत्ती, बुद्धिमत्ता या गुणांना भरपूर संधी आहे.
संरक्षण दलातील नोकरी हे एक उदात्त व राष्ट्रसेवेचे कार्य आहे. सैन्यदलाबद्दल जनतेला प्रचंड आदर आहे. संरक्षण दलात नोकरी करताना देशसेवा, राष्ट्रप्रेम, शिस्तप्रिय जीवन, साहस, धैर्य, कष्ट, अभ्यास, नवीन आव्हान या गुणांना वाव मिळतो. देशाचे परकीय आक्रमणापासून रक्षण करून देशवासीयांची सुरक्षितता सांभाळणे, देशात शांतता प्रस्थापित करणे, देशाची अंतर्गत सुरक्षा व नागरिकांचे रक्षण करणे या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या संरक्षणदलास सांभाळायच्या असतात.
दहावी, बारावीनंतर अथवा पदवीनंतर संरक्षण दलात नोकरी करायची आहे, असे म्हणणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. संरक्षण दलाविषयी अनेक नकारात्मक दृष्टीकोन असतात. संरक्षण दलाच्या लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, मुलाखती व वैद्यकीय चाचणी या अत्यंत कठीण असतात. येथे डोंगर, दऱ्या, बर्फाळ प्रदेश यात नोकरी, अतिरेक्यांशी सामना, संरक्षण दलात जिवाला धोका, सातत्याने बदल्या, सातत्याने युद्ध या गैरसमजुतींमुळे अनेकांना संरक्षण दलाविषयी फारशी माहिती नसते. कृषी, कायदा, विज्ञान, तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, माहिती व तंत्रज्ञान या विषयांतून पदवी प्राप्त करणाऱ्या युवकांना संरक्षण दलात करिअरच्या भरपूर संधी असतात. मात्र येथे करिअर करण्यासाठी सूत्रबद्ध, शिस्तबद्ध नियोजनाची गरज असते.
संरक्षण दलातील नोकरी ही देशासाठी अभिमानास्पद बाब आहे. या नोकरीत चांगला पगार, आर्थिक सुरक्षितता, चांगल्या सुविधा, निवृत्तिवेतन, वन रँक पेन्शन, बचतीच्या उत्तम संधी, भत्ते, विशेष वेतन मिळते. शिवाय व्यावसायिक प्रशिक्षण, केंद्रीय विद्यालयात व उच्च शिक्षणात पाल्यांना प्रवेशात अग्रक्रम, MBA व MCS करण्यासाठी रजा या सुविधा आहेत. तसेच कल्याण निधीच्या माध्यमातून पाल्यांना शिक्षणासाठी मदत, शिष्यवृत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.
संरक्षण दलात अधिकारी किंवा शिपाई अशा दोन प्रकारे प्रवेश मिळतो. संरक्षण दलात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी सैनिक व्हायचे किंवा अधिकारी व्हायचे हे ध्येय अगोदर निश्चित केले पाहिजे. सैनिक किंवा जवान म्हणून १०वी किंवा १२वीनंतर आणि वायुदल, नौदलात १२वीनंतर प्रवेश देण्यात येतो. नौदल, वायुदलाच्या काही विशिष्ट विभागांसाठी १०वीनंतरही प्रवेश देण्यात येतो. महाराष्ट्रात औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे भूदल आणि नौदल सैनिकांसाठी प्रवेश केंद्र आहेत. वायुदलातील एअरमन म्हणून भरतीसाठी मुंबई येथील कॉटनग्रीन वायुदलाच्या केंद्रात प्रवेश आहेत.
संरक्षण दलात अधिकारी होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ((UPSC)) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नाविक
अकादमी (NDA व NA) ची परीक्षा घेतली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा (CDS) ही परीक्षाही संरक्षण दलातील अधिकारी होण्यासाठी घेतली जाते. तसेच टेरोटरिअल आर्मीच्या माध्यमातून संरक्षण दलात अधिकारी होता येते. त्याच प्रकारे (NCC) च्या सी सर्टिफिकेट मिळालेल्या विद्यार्थ्यांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्डामार्फत संरक्षण दलात अधिकारी होण्याची संधी उपलब्ध आहे. ‘टेक्निकल ग्रॅज्युएट एन्ट्री स्कीम’, ‘टेक्निकल एन्ट्री स्कीम’, ‘जज अॅडव्होकेट एन्ट्री’ व ‘युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीम’द्वारे संरक्षण दलात अधिकारी होण्याची संधी उपलब्ध आहे. संरक्षण दलात मुलींनाही अधिकारी होता येते. संरक्षण दलाच्या सेवेत कनिष्ठांचा आदर व वरिष्ठांचा विश्वास हा मूलमंत्र आहे.