सेवा, जिद्दीला सलाम

By admin | Published: December 5, 2014 09:26 AM2014-12-05T09:26:04+5:302014-12-05T10:39:39+5:30

ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देण्याच्या केलेल्या निर्धारातून महिलांमध्ये आत्मविश्वासाचे बळ प्रस्थापित करीत अत्यंत उत्साही वातावरणात ‘लोकमत वुमन समिट २०१४’ चा सोहळा रंगला.

Service, salute to jiddi | सेवा, जिद्दीला सलाम

सेवा, जिद्दीला सलाम

Next

महिलांच्या प्रश्नावर जागर : ‘लोकमत वुमेन समिट २०१४’चा रंगला सोहळा

पुणे : महिलांच्या सबलीकरणासाठी ‘सारे आकाश तुमचे’ या संकल्पनेचा केलेला जागर... आणि ‘संकोच आता... बास...’ असे सांगत ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देण्याच्या केलेल्या निर्धारातून महिलांमध्ये आत्मविश्वासाचे बळ प्रस्थापित करीत अत्यंत उत्साही वातावरणात ‘लोकमत वुमन समिट २०१४’ चा सोहळा रंगला. विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पुरस्कारांचे वितरणही या वेळी झाले. या सेवाभावी महिलांसोबतच शौचालय बांधण्यासाठी स्वत:चे दागिने विकणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांच्या जिद्दीलाही सलाम करण्यात आला.
‘लोकमत माध्यम समूहा’च्या वतीने एनईसीसीच्या सहकार्याने पुण्यात आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन ‘रिपब्लिकन आॅफ युगांडा’च्या उच्चायुक्त एलिझाबेथ पाटालो नापेयोक, केनियाच्या उच्चायुक्त फ्लोरेन्स इमिसा वेचे, अ‍ॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्षा अमृता फडणवीस, यूएसके फाउंडेशनच्या संचालिका उषा काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. ‘लोकमत मीडिया प्रा. लि.’चे चेअरमन खासदार विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते.
कृतिशील पत्रकारितेत आणखी एक पाऊल पुढे टाकत ‘लोकमत माध्यम समूहा’च्या वतीने विविध क्षेत्रांत उत्तुंग कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण या वेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. ‘मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव पुरस्कार’ ‘शाश्वत’ संस्थेच्या माध्यमातून आदिवासींच्या विकासासाठी काम करणाऱ्या कुसुमताई कर्णिक यांना, तर सौ. ज्योत्स्ना दर्डा कार्यगौरव पुरस्कार नक्षलग्रस्त गडचिरोलीत ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेच्या माध्यमातून आरोग्यासाठी काम करणाऱ्या शुभदा देशमुख यांना प्रदान करण्यात आला.
परिषदेमध्ये ‘नोकरदार महिलांसमोरील प्रश्न’ या विषयांवर चर्चा करण्यात आली. कामावर होणारे लैंगिक शोषण, आरोग्याचे होणारे दुर्लक्ष अशा विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आले. त्याचबरोबर ‘ब्रेस्ट कॅन्सर’विरुद्ध लढण्यासाठी ‘संकोच...आता बास’ या मोहिमेच्या लोगोचे अनावरण अभिनेत्री लिसा रे यांनी केले. परिषदेचे सूत्रसंचालन ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांनी केले.
--------------------
महिलांचे मनोबल उंचावत, त्यांचा आत्मविश्वास जागवित निश्चयाचे बळ त्यांच्या मनात दृढ करण्यासाठी माझी सुविद्य पत्नी सौ. ज्योत्स्ना दर्डा यांच्या कल्पनेतून १९९९ मध्ये ‘लोकमत सखी मंच’ची स्थापना झाली. महिलांच्या अभिव्यक्तीला मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून, देण्याचा हेतू त्यामागे होता. विचारांच्या या अभिव्यक्तीचा देशपातळीवर जागर व्हावा, यासाठी सौ. ज्योत्स्ना यांच्या कल्पनेतूनच ‘लोकमत वुमेन समिट’ची सुरुवात झाली. या वर्षीच्या ‘वुमेन समिट’ची कल्पना ‘वर्किंग वुमेन अ‍ॅँड देअर इश्यूज’ (नोकरदार महिलांसमोरील प्रश्न) ही आहे. महिलांचे हे प्रश्न केवळ आपल्याकडेच नाहीत, तर त्याचे स्वरूप वैश्विक आहे. यंदाच्या ‘समिट’मध्ये ‘इंडो-आफ्रिकन नोकरदार महिलांची सद्य:स्थिती’ या विषयावरही एक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
- खासदार विजय दर्डा, चेअरमन, लोकमत मीडिया प्रा. लि.
---------------------
आम्ही आदिवासी समाजात काम करीत असताना, आदिवासी खूप मागे असल्याचे बोलले जाते़ पण, अन्य समाजापेक्षा ते अतिशय पुढे गेलेले आहेत़ त्यांच्याबरोबर काम करताना कधी उपाशी राहिलो नाही़ जे असेल ते स्पष्टपणे सांगायचे़ ताई, आज एवढेच आहे़ ‘लोकमत’च्या या उपक्रमात सहभागी होऊन खूप छान वाटले़ अनेकदा समाजाचे चित्र वाईट पद्धतीने पुढे येते़ आपण या कार्यक्रमाद्वारे आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे़
- कुसुमताई कर्णिक, मातोश्री वीणादेवी दर्डा पुरस्कार मानकरी
-----------------------
ईशान्य भारतात जसे इकडून गेलेल्यांना नागरिक मानले जात नाही, तशीच परिस्थिती गडचिरोली भागातून शहरात आलेल्या आदिवासांना अजूनही आपले नागरिक मानत नाही, असा प्रसंग मुंबईत आमच्या वाट्याला आला होता़ आम्ही आदिवासी भागात काम सुरु केल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आहेत़ स्त्रिया बोलत्या झाल्या आहेत़ त्यांना आणखी पुढे जाण्यासाठी काही प्रोत्साहनाची गरज आहे़ ‘लोकमत वुमेन समिट’सारख्या उपक्रमांतून त्याला अधिक
बळ मिळेल.
- शुभदा देशमुख , सौ. ज्योत्स्ना दर्डा कार्यगौरव पुरस्कार मानकरी

Web Title: Service, salute to jiddi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.