चटणी-भाकरीच्या रूपाने नेहरूंची सेवा
By admin | Published: November 14, 2015 03:46 AM2015-11-14T03:46:38+5:302015-11-14T03:46:38+5:30
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अहमदनगर किल्ल्यातील साडेतीन वर्षांच्या बंदिवासात काही मोजक्या स्थानिक नेत्यांशी संबंध आला
योगेश गुंड, अहमदनगर
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अहमदनगर किल्ल्यातील साडेतीन वर्षांच्या बंदिवासात काही मोजक्या स्थानिक नेत्यांशी संबंध आला. त्यातील एक राजाराम साठे (पाटील). यजमानामार्फत नेहरूंना राजाराम पाटलांचा डबा किल्ल्यात जात होता. चटणी-भाकरीच्या रूपाने नगर तालुक्यातील नारायणडोहोसारख्या खेड्यातील स्वातंत्र्यसैनिकाला त्यांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले.
नारायणडोहो येथील राजाराम मोराजी साठे विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनात, तसेच स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय होते. मोतीलाल फिरोदिया कुटुंबाकडे नेहरूंचे व इतर राष्ट्रीय नेत्यांचे यजमानपद होते. नेहरू १९४२च्या स्वातंत्र्यलढ्यात १० आॅगस्ट ते २८ मार्च १९४५ या काळात भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. या काळात नेहरू जसे नगरच्या घट्ट ‘बासुंदी’च्या प्रेमात पडले, तसेच राजाराम पाटलांच्या चटणी-भाकरीच्याही. यजमान यांच्यामार्फत नेहरूंना डबा देण्यासाठी राजाराम पाटील नारायण डोहो ते नगर हे १५ किलोमीटरचे अंतर पायी जात. त्यांच्या घरच्या चटणी-भाकरीच्या चवीने नेहरूंना मोठे समाधान मिळे.
१९७२ला इंदिरा गांधी यांची भेट घेऊन त्यांनी नेहरूंच्या आठवणींचा उजाळा दिला. इंदिराजींनाही राजाराम पाटलांबद्दल आदर व आपुलकी वाटली.