अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे
By Admin | Published: March 9, 2015 05:33 AM2015-03-09T05:33:04+5:302015-03-09T05:33:04+5:30
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालून विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीने या सरकारची संभावना ‘
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालून विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीने या सरकारची संभावना ‘घूमजाव सरकार’ अशी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अत्यंत आक्रमक पवित्रा घेत आपण विरोधकांनी त्यांच्या सत्ताकाळात केलेली पापे या अधिवेशनात उघड करणार असल्याचा दावा केला. त्यामुळे हे अधिवेशन पहिल्या दिवसापासून वादळी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेनेनी हटवादी भूमिका घेतली तर भाजपाच्या नाकीनऊ येऊ शकतात तर राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपाची छुपी युती विरोधकांचे कंबरडे मोडू शकते.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकारच्या १०० दिवसांच्या कामगिरीची श्वेतपत्रिका काढण्याची जी मागणी केली आहे त्याचा पाठपुरावा करण्याचे विरोधकांनी जाहीर केले आहे. त्यामुळे अधिवेशन काळात शिवसेना पक्षप्रमुख व शिवसेनेचे मंत्री कोणती भूमिका घेतात यावर सरकारची अधिवेशनातील कामगिरी अवलंबून राहणार आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेच्या सभापतींविरुद्ध दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव अजून मागे घेतलेला नाही. हा प्रस्ताव मागे घ्यावा याकरिता काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. अधिवेशन काळात विरोधकांमध्ये फूट पाडण्याची रणनीती भाजपाकडून आखली जाऊ शकते. (विशेष प्रतिनिधी)