सत्र न्यायालयात दारू पार्ट्या
By admin | Published: July 19, 2016 05:39 AM2016-07-19T05:39:49+5:302016-07-19T05:39:49+5:30
नेहमी हायअॅलर्टवर असणाऱ्या सत्र न्यायालयात सध्या दारू पार्ट्या रंगत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे
मनीषा म्हात्रे,
मुंबई- नेहमी हायअॅलर्टवर असणाऱ्या सत्र न्यायालयात सध्या दारू पार्ट्या रंगत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या शौचालयात दारूच्या बाटल्या असल्याचा व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. त्याची खातरजमा केली असता, आजही या बाटल्यांचा खच शौचालयाच्या आवारात पाहावयास मिळाला. त्यामुळे सत्र न्यायालयातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मुंबईतील कुलाबा येथील सत्र न्यायालयात टाडा, सीबीआय, एनआयए, एनडीपीएस, मोक्कासारखी वेगवेगळी न्यायालय आहेत. दहशतवाद्यांपासून कुख्यात गुंडांचे खटले याच ठिकाणी चालतात. नेहमीच अॅलर्टवर असलेल्या न्यायालयात काटेकोर सुरक्षा ठेवण्यात आली आहे. कडेकोट सुरक्षेतून तंबाखूची पुडीही आतमध्ये नेण्यास बंदी असते. अशा परिस्थितीत येथील पहिल्या मजल्यावरील न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या पुरुष शौचालयात दारूच्या सापडलेल्या बॉटलमुळे सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. दारूच्या बाटल्यांचा खच असलेला हा व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती लागला. त्यानुसार, ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने तेथे जाऊन खातरजमा केली. सत्र व दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या पुरुष शौचालयात दारूच्या बाटल्या आढळून आल्या. विशेष म्हणजे याच मजल्यावर एनडीपीएसचे न्यायालय आहे. त्यात हा सर्व परिसर सीसीटीव्हीने वेढला आहे. अशात न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या या शौचालयाचा वापर पोलीस तसेच तेथील कर्मचारी बाटल्यांकडे पाहून काणाडोळा करत असल्याचे पाहावयास मिळाले. सत्र न्यायालयात प्रवेश करण्यासाठी सामान्यांसाठी दोनच प्रवेशद्वार आहेत. तसेच अन्य प्रवेशद्वारातून वकिलांसाठी सोय करण्यात आली आहे. असे असताना नागरिकांच्या प्रवेशद्वारावरील स्कॅनर मशीन तसेच मेटल डिटेक्टर बंद असल्याने तेथील पोलीस स्वत:च सामानाची तपासणी करतात, तरीही दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. त्यामुळे पोलीस, आरोपी आणि न्यायालयातील सुरक्षा यंत्रणेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.
>आरोपीही होतात पसार
२१ सप्टें. २०१३ अहमदाबाद आणि सुरत बॉंबस्फोट प्रकरणांचा सूत्रधार असलेला इंडियन मुजाहिदीनचा (आयएम) दहशतवादी अफजल उस्मानी याने पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) गुंगारा देत या न्यायालयातून पलायन केले होते.
२३ सप्टें २०१५ न्यायालयाने कोठडी सुनाविल्यानंतर जामीन अर्जाच्या मागणीसाठी बाहेर पडलेल्या तौफिक अहमद झैदीने (३०) पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला होता.
१६ सप्टे. १९८३ सत्र न्यायालयात पठाण गंगच्या आमिर जादाला हजर करण्यात आले होते. त्यावेळी दाऊदने न्यायाधिशांच्या समोरच साक्षीदाराच्या बॉक्समध्येच त्याला गोळ्या घातल्या होत्या.
>ड्रग्जचाही पुरवठा
अवघ्या दोन हजारांत आरोपींना ड्रग्जही मिळत असल्याचे सूत्रांकडून समजते. विशेष म्हणजे, पोलिसांकडूनच हे पुरविण्यात येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
...तर शस्त्रेही आत
ज्या पद्धतीने सत्र न्यायालयात दारूच्या बाटल्या येत आहेत. त्याप्रमाणे, उद्या कोणीही येथे शस्त्रसाठा पुरवून हल्ला करू शकतो.
हा सर्व परिसर सीसीटीव्हीने वेढला आहे. अशात न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या या शौचालयाचा वापर पोलीस, तसेच तेथील कर्मचारी करतात. डोळ््यांदेखत असलेल्या बॉटलकडे पाहून ही मंडळी दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.