एफडीएमध्ये १० सीसीटीव्ही बसवणार
By admin | Published: October 1, 2016 01:40 AM2016-10-01T01:40:09+5:302016-10-01T01:40:09+5:30
आयपीएस अधिकारी व एफडीएचे दक्षता विभागाचे प्रमुख हरीश बैजल यांच्या कार्यालयाची मोडतोड झाल्याच्या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने त्वरित कारवाई सुरू केली असून, कार्यालयाची
- अतुल कुलकर्णी, मुंबई
आयपीएस अधिकारी व एफडीएचे दक्षता विभागाचे प्रमुख हरीश बैजल यांच्या कार्यालयाची मोडतोड झाल्याच्या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने त्वरित कारवाई सुरू केली असून, कार्यालयाची इमारत व परिसरात आणखी १० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती विभागाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
प्रशासकीय जबाबदाऱ्या पार न पाडल्याबद्दल व कर्तव्यात कसूर केल्याबद्दल प्रशासनातील सह आयुक्त, सहायक आयुक्त व औषध निरीक्षक दर्जाच्या १० अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्याचा अंतरिम अहवाल शासनास सादर झाला आहे. नोटिसा बजावलेल्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरणही दिले असून, या प्रकरणी त्या अधिकाऱ्यांचे कर्तव्य तसेच इतर अनुषंगिक कायदे व नियम तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम अनुषंगाने छाननीचे काम चालू आहे. लवकरच या अधिकाऱ्यांवर पुढील कारवाईबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवणार असल्याचेही आयुक्त डॉ. कांबळे म्हणाले.
याबाबत डॉ. कांबळे यांनी एक निवेदनही दिले असून, त्यात बैजल यांच्या कार्यालयाची मोडतोड बाहेरील व्यक्तीने केलेली नसल्याचे कबूल केले आहे. बैजल यांच्या कार्यालयात मोडतोड झाल्यानंतर स्वत: सीसीटीव्ही फूटेज तपासले, तसेच तंत्र अधिकारी वर्ग १ दर्जाच्या अधिकाऱ्याकडूनही त्याची तपासणी केली. या फूटेजमध्ये कार्यालयाबाहेरील व्यक्तीने सह आयुक्त बैजल यांच्या दालनात प्रवेश केल्याचे दिसून आलेले नाही, असे स्पष्ट करून डॉ. कांबळे पुढे म्हणतात, यात दोन सफाई कर्मचारी व दोन शिपाई यांनीच दालनात प्रवेश केल्याचे दिसत आहे. त्यामुळे घटनेस कोण जबाबदार आहे हे उघडकीस न आल्याने या घटनेचे गांभीर्य पाहता याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर खेरवाडी पोलिसांनी चौकशीसाठी कार्यालयाला एकदा भेट दिल्याचेही त्यांनी म्हटले. तपासाच्या निष्कर्षानुसार कारवाई केली जाईल, तर या घटनेनंतर सुरक्षारक्षकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिल्याचेही डॉ. कांबळे यांनी त्यात म्हटले आहे.