टोलनाक्यांवर इलेक्ट्रॉनिक मशीन बसवणार
By admin | Published: February 8, 2016 04:28 AM2016-02-08T04:28:46+5:302016-02-08T04:28:46+5:30
राज्यातील प्रत्येक टोलनाक्यावर यापुढे इलेक्ट्रॉनिक मशीन बसविणार असून, त्याचा सर्व्हर राज्य शासनाकडे असेल. या नाक्यांवर रोज किती पैसे जमा होतात,
कोल्हापूर : राज्यातील प्रत्येक टोलनाक्यावर यापुढे इलेक्ट्रॉनिक मशीन बसविणार असून, त्याचा सर्व्हर राज्य शासनाकडे असेल. या नाक्यांवर रोज किती पैसे जमा होतात, याचा हिशेब ठेवणारे टोलबाबतचे अत्यंत पारदर्शी धोरण राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली.
कोल्हापुरातील टोल कायमचा रद्द केल्याबद्दल सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या वतीने प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री फडणवीस यांचा ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन.डी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. या समारंभाकडे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाठ फिरविली.
मुख्यमंत्री म्हणाले, सरकारचा टोल धोरणास सरसकट विरोध नाही; कारण हे धोरण जगाने स्वीकारलेले आहे. मात्र या धोरणाच्या अंमलबजावणीबाबत दुमत आहे. आमच्या खिशातून काढून घेतलेला पैसा विकासासाठी न जाता त्यातून दुसराच कुणीतरी श्रीमंत होत आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात जनमानसात चीड आहे. ज्या रस्त्यांचे पैसे सात किंवा नऊ वर्षांत फिटले असते तिथे ३०-३० वर्षे टोल लावले. हे आम्ही यापुढे चालू देणार नाही.