सेट परीक्षा यंदा नाहीच!
By admin | Published: November 5, 2014 04:16 AM2014-11-05T04:16:12+5:302014-11-05T04:16:12+5:30
त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी फेब्रुवारी/मार्च २०१५ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमधील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट (सेट) परीक्षा यंदा होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी फेब्रुवारी/मार्च २०१५ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे सेट परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जात होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यात खंड पडला आहे. वर्षातून दोन वेळा होणाऱ्या परीक्षा आता एका वर्षाआड एक अशा पद्धतीने घेतल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्रनाराजी आहे. परंतु, विद्यापीठाला प्रत्येक परीक्षा घेण्यापूर्वी यूजीसीच्या ‘री-अॅक्रिडिटेशन’ समितीकडून परीक्षा घेण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. मात्र, समितीकडून परवानगी घेण्याची प्रक्रिया खूप मोठी आणि संथ गतीने चालत असल्याने विद्यापीठाला परीक्षा आयोजित करण्याबाबत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
यूजीसीच्या निर्देशानुसार सेट विभागाने २०११ मध्ये दोन परीक्षा घेतल्या होत्या. परंतु, २७ नोव्हेंबर २०११ आणि ७ आॅगस्ट २०११ या रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर २०१२मध्ये विद्यापीठाला एकही सेट परीक्षा घेणे शक्य झाले नाही. त्यानंतर विद्यापीठाने यूजीसीकडून सेट परीक्षा घेण्याची परवानगी प्राप्त करून १७ फेब्रुवारी २०१३ रोजी एक सेट परीक्षा आयोजित केली. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास काहीसा विलंब झाला. तरीही डिसेंबर २०१४ मध्ये सेट परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठाकडून प्रयत्न केले जात होते. मात्र, नोव्हेंबर महिना उजाडला तरीही यूजीसीच्या ‘री अॅक्रिडिटेशन’ समितीने अद्याप विद्यापीठाला भेट देऊन परीक्षा घेण्याची परवानगी दिलेली नाही.