लोकप्रतिनिधींसाठी प्रशिक्षण केंद्रे उभारावी
By admin | Published: July 6, 2017 03:41 AM2017-07-06T03:41:59+5:302017-07-06T03:41:59+5:30
राजकारणातून उच्चशिक्षित आणि चारित्र्यसंपन्न लोकप्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभेत पाठवले पाहिजेत. त्यासाठी देशभरात विविध
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राजकारणातून उच्चशिक्षित आणि चारित्र्यसंपन्न लोकप्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभेत पाठवले पाहिजेत. त्यासाठी देशभरात विविध ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे उभारली जावीत, अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी व्यक्त केली. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे हजारे यांनी या वेळी सांगितले.
माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंटतर्फे केंद्रीय यूपीएससी परीक्षेत देशातून पहिली आलेली नंदिनी के. आर. आणि तिसरा आलेला गोपालकृष्ण रोनांकी यांच्यासह इतर यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी माईर्स एमआयटीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, तेलंगणातील पोलीस अधिकारी महेश भागवत, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालास्वामी, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी चेअरमन डी. पी. अगरवाल उपस्थित होते.
अण्णा हजारे म्हणाले, ‘‘नव्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची कथनी आणि करनी एक असेल तर देश बदलण्यास वेळ लागणार नाही. देशात चारित्र्यसंपन्न अधिकारी निर्माण झाले तर गेल्या ७० वर्षांत देशात जे कार्य झाले नाही ते कार्य अवघ्या १० वर्षांत देश बदलू शकेल.’’
सत्काराला उत्तर देताना नंदिनी के. आर. म्हणाली, की प्रेरणा, प्रयत्न आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर यश प्राप्त होते. यशप्राप्तीनंतर आपली पाळेमुळे विसरता कामा नयेत. मुलांचा कल जिकडे असेल त्या क्षेत्रात यशप्राप्तीसाठी आपल्या मुलांना सर्व पालकांनी प्रोत्साहन द्यावे.
या वेळी विश्वनाथ कराड, मेजर जनरल दिलावर सिंग, गोपाळकृष्ण रोनांकी यांनी मनोगत व्यक्त केले. राहुल विश्वनाथ कराड यांनी प्रास्ताविक केले. शैलश्री हरिदास यांनी प्रास्ताविक केले. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. सुजीत धर्मपात्र यांनी आभार मानले.
फक्त भाषणाने समाज बदलत नाही
निवडणुका आल्या की आपल्याकडे दोन-दोन तास फक्त भाषणांचा भडिमार जनतेवर होतो. मात्र भाषणाने समाज बदलत नाही, त्याला शब्द आणि कृतीची जोड लागते, असा टोला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राजकीय नेत्यांना लगावला.
समाजाकडून तुमच्याबद्दल भरपूर अपेक्षा आहेत. यंत्रणेमध्ये काम करताना अविरत कष्ट आणि प्रामाणिकपणे कार्य करावे. आपली निर्णयक्षमता व इच्छाशक्तीच्या जोरावर चांगले प्रशासन येऊ शकते. आपले निर्णय समाजाभिमुख कसे असतील, यावर अधिक लक्ष केंद्रित करावे.
- डी. पी. अगरवाल
यूपीएसी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत प्रामाणिकपणे काम करून चांगले प्रशासन निर्माण करावे. सतत नवीन गोष्टी शिकून आपल्या कामाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करावा. नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे आपला अधिक कल असायला हवा.
- एन. गोपालास्वामी