राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांना धक्का; भाजपाच्या आमदार राम शिंदेंनी मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 12:35 PM2022-08-05T12:35:42+5:302022-08-05T12:36:28+5:30
राज्यातील ग्रामपंचायतीचे निकाल आता हळूहळू समोर येत आहे. त्यात काही ठिकाणी शिंदे गटाला विजय मिळत असल्याचं दिसून आले आहे.
कर्जत - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, भाजपा विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट यांच्यात प्रतिष्ठेची लढाई आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील ग्रामपंचायतीचे निकाल समोर आले आहेत. त्यात रोहित पवारांना मोठा धक्का बसला आहे.
अलीकडेच राम शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या त्यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायतीत राम शिंदे गटाने वर्चस्व राखलं आहे. कर्जत तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायती राम शिंदे यांच्याकडे आल्या आहेत. कोरेगाव येथे १३ पैकी ७, बजरंगवाडी येथे ७ पैकी ५, कुळधरण येथे १३ पैकी ७ जागांवर राम शिंदे गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. त्यामुळे या निकालाने स्थानिक आमदार रोहित पवार यांना धक्का बसला आहे.
राज्यात एकनाथ शिंदे गटाची विजयी वाटचाल
औरंगाबाद येथील अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात असलेल्या ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने वर्चस्व राखलं आहे. याठिकाणी ३ पैकी २ ग्रामपंचायतीत शिंदे गटाची सत्ता आली आहे. नानेगाव आणि जंजाळ ग्रामपंचायतीत शिंदे गटाने विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे सातारा येथे शिंदे गटाने पहिली ग्रामपंचायत जिंकली आहे. शिंदे गटाचे आमदार शंभुराज देसाई यांच्या मतदारसंघात उत्तर तांबवे येथे देसाई पॅनेल विजयी झाले आहे. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीत २२ वर्षानंतर सत्तांतर घडलं आहे. पैठण तालुक्यात ७ पैकी ६ ग्रामपंचायतीत शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्या पॅनेलचा दणदणीत विजय झाल्याचं दिसून येत आहे. अपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अनरनांदर, गावंतांडा या ग्रामपंचायती शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत.
उद्धव ठाकरे गटाला मिळालं यश
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पहिल्याच निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला बोलबाला पाहायला मिळाला आहे. चिंचपूरच्या या निकालामुळे भाजपाचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांना मोठा धक्का मानला जात आहे. सोलापूरात देशमुख यांचे वर्चस्व आहे. मात्र चिचंपूरमधील ग्रामपंचायतीच्या निकालाने उद्धव ठाकरे गटाने बाजी मारत भाजपाला चितपट केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीचे निकाल लागणार आहेत. यात पहिला निकाल चिंचपूर ग्रामपंचायतीचा लागला असून शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे ७ पैकी ७ सदस्य निवडून आल्यानं कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष व्यक्त केला आहे.