सुरक्षा समिती स्थापन करणार - गिरीश महाजन
By admin | Published: March 22, 2017 02:02 AM2017-03-22T02:02:21+5:302017-03-22T02:02:21+5:30
निवासी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टरांसमवेत सोमवारी रात्री बैठक घेतली
मुंबई : निवासी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टरांसमवेत सोमवारी रात्री बैठक घेतली. प्रत्येक महाविद्यालयांत सुरक्षा समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
सुरक्षा समितीमध्ये २ प्राध्यापक, ३ निवासी डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश असेल; शिवाय या समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ प्राध्यापक असतील. या समितीची बैठक दर महिन्यास घेऊन सुरक्षाविषयक बाबींची चर्चा करून संस्थास्तरावरील उपाय अधिष्ठातांना सुचविले जातील, असा निर्णय महाजन यांनी डॉक्टरांसोबतच्या या उच्चस्तरीय बैठकीत घेतला आहे. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने, शासकीय दंत महाविद्यालय उपअधिष्ठाता डॉ. पंकजा अगळ, महाराष्ट्र राज्य मार्ड संघटनेचे सचिव डॉ. स्वप्निल मेश्राम व अन्य रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. डॉक्टरांना महाराष्ट्र पोलीस सुरक्षा महामंडळ यांच्यामार्फत टप्प्याटप्प्याने सुरक्षारक्षक पुरविण्यात येतील. त्यातील पहिल्या टप्प्यात ५०० सुरक्षारक्षक एप्रिल २०१७च्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयांत पुरविण्यात येतील. त्यानंतर पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे सुरक्षारक्षक नेमण्यात येतील. एकूण १,१०० सुरक्षारक्षक ३० एप्रिलपर्यंत पुरविण्यात येतील. काही सुरक्षारक्षक शस्त्रधारी असतील, त्यांना संवेदनशील ठिकाणी नेमण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली सर्व महाविद्यालयांचे सुरक्षा आॅडिट केले जाईल व त्यांनी सुचविलेल्या उपाययोजना केल्या जातील. तसेच डॉक्टर प्रोटेक्शन अॅक्टमध्ये सुधारणा करावी, रुग्णालयांमध्ये अलार्म सिस्टीम, रुग्णांना प्रवेश पास आणि निवासी डॉक्टरांना क्षयरोग व प्रसूती रजा यांविषयीही तरतूद करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)