मंजुळा हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन
By admin | Published: June 30, 2017 02:07 AM2017-06-30T02:07:35+5:302017-06-30T02:07:35+5:30
मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी राज्य महिला आयोगाकडून विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार आहे. माजी न्यायमूर्ती, माजी पोलीस आयपीएस अधिकारी,
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी राज्य महिला आयोगाकडून विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार आहे. माजी न्यायमूर्ती, माजी पोलीस आयपीएस अधिकारी, एक एनजीओ सदस्य या समितीत असणार आहे. तसेच गुरुवारी कारागृह प्रशासनाकडून राज्य महिला आयोगाला चौकशी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात मंजुळाच्या गुप्तांगात जखम नसल्याचा दावा त्यांनी प्राथमिक अहवालावरून केला आहे. मात्र कारागृह प्रशासन आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे.
वॉर्डन मंजुळाला झालेल्या अमानुष मारहाणीत २३ जून रोजी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कारागृहातील महिला कैद्यांचा उद्रेक झाला. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी जेल अधिकारी मनीषा पोखरकरसह सहा जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र आठवडा उलटत आला तरी आरोपींवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणी कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी पोलीस महानिरीक्षक (कारागृहे) स्वाती साठे यांनी हा अहवाल राज्य महिला आयोगाकडे सादर केला. यामध्ये घटनेचा उल्लेख करत मंजुळाच्या गुप्तांगाला जखम नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तिच्या अंगावर अनेक जखमा असल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आल्याचा उल्लेख त्यांनी या अहवालात केला आहे. याचा अंतिम अहवाल येणे बाकी आहे. त्यांच्या चौकशी अहवालामुळे कारागृह प्रशासन आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. हा विषय संवेदनशील असल्याने राज्यातील महिला कैद्यांचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील विविध कारागृहांतील महिलांची काय परिस्थिती आहे; तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाय योजना केल्या, याचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्यास सांगण्यात आल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले.
तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये माजी न्यायमूर्ती, माजी पोलीस आयपीएस अधिकारी, एक एनजीओ सदस्य असतील.
येत्या दोन दिवसांत एसआयटी समितीतील सदस्यांची नावे घोषित करणार असल्याची माहिती महिला आयोग अध्यक्ष विजया रहाटकर
यांनी दिली. मंजुळा प्रकरणाचा शवविच्छेदन अंतिम अहवाल लवकरात लवकर मिळावा, अशी मागणीदेखील या वेळी त्यांनी केली. गुरुवारी सायंकाळी त्यांनी कारागृहाला भेट दिली.
इंद्राणीलाही मारहाण
मंजुळाप्रमाणे आपल्यालाही मारहाण झाल्याचा दावा करत इंद्राणीने सीबीआय कोर्टात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार बुधवारी सीबीआय कोर्टाच्या आदेशाने नागपाडा पोलिसांनी इंद्राणीचा जबाब नोंदवून घेतला आहे. बुधवारी तिची जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तिला मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती जे.जे. रुग्णालयाकडून गुरुवारी समोर आली आहे. त्यानुसार नागपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.