कांदळवन क्षेत्रात साडेसात हजार रोजगार; संशोधनासाठी ७५ शिष्यवृत्ती देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 06:12 AM2022-09-14T06:12:55+5:302022-09-14T06:13:22+5:30
राज्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, डहाणू, ठाणे, अलिबाग, रोहा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे सागरी जीव बचाव वाहने कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कांदळवन क्षेत्रात ७ हजार ५०० नवीन रोजगार निर्माण करण्यात येणार आहेत.
तसेच महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानमार्फत जैवविविधता विषयात संशोधन करणाऱ्या ७५ मुलांना जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात संशोधन करण्यासाठी येत्या तीन वर्षांत शिष्यवृत्ती देण्यात येईल. यासाठी प्रत्येक वर्षी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाची पाचवी बैठक मंगळवारी सह्याद्री अतिथिगृह येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सागरी जीव बचाव वाहन लवकरच
राज्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, डहाणू, ठाणे, अलिबाग, रोहा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे सागरी जीव बचाव वाहने कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यापैकी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे सागरी जीव बचाव वाहन लवकरच दाखल होणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.
कांदळवन क्षेत्रावर सीसीटीव्हीची नजर
वनमंत्री म्हणाले की, कांदळवन क्षेत्रात सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. भिवंडी परिक्षेत्र, पश्चिम व मध्य मुंबई, नवी मुंबई व ठाणे खाडी, फ्लेमिंगो अभयारण्य परिक्षेत्र येथे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. साधारणपणे १०६ ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येतील.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील स्थलांतरित पक्ष्यांच्या स्थलांतरित मार्गाचा अभ्यास करणे, ठाणे खाडी येथे फ्लेमिंगो अभयारण्य उभारणे, ऐरोली येथे गस्तीसाठी सौर ऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक बोट, कांदळवन संरक्षण आणि संवर्धन यासाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक, तसेच आवश्यक तेथे भिंत घालणे, असे विषय प्राधान्याने मार्गी लावावेत, अशा सूचनाही मुनगंटीवार यांनी दिल्या.