आईला दिला सात मुलींनी खांदा
By दादाराव गायकवाड | Published: September 2, 2022 01:04 PM2022-09-02T13:04:17+5:302022-09-02T13:04:29+5:30
वृद्धत्त्वाने निधन झालेल्या आईला सात मुलींनी खांदा देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करीत समाजासमोर आदर्श निर्माण केला.
मंगरुळपीर: (वाशिम): वृद्धत्त्वाने निधन झालेल्या आईला सात मुलींनी खांदा देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करीत समाजासमोर आदर्श निर्माण केला. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरात रावपलाई परिवारातील मुलींनी शुक्रवारी समाजासमोर असा आदर्श ठेवला आहे.
मंगरुळपीर शहरातील कुंभकार समाजातील सुमनबाई गेंदुलाल रावपलाई यांचे वृद्धापकाळाने १ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि सात मुली आहेत. आईच्या निधन झाल्यानंतर त्यांच्या सातही मुली अंत्यदर्शनासाठी आल्या आणि अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. या सातही मुलींनी आईच्या पार्थिवास खांदा देऊन मुली-मुलामधील भेदच नाहीसा करीत समाजासमोर आदर्श ठेवला, तसेच त्यांच्या चितेला अग्नी देऊन अंत्यसंस्काराचे सोपस्कारही पार पाडले.