हिंगोली, जालन्यासह राज्यातील सात जिल्हे शैक्षणिकदृष्ट्या मागास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 05:58 AM2021-08-11T05:58:04+5:302021-08-11T05:58:30+5:30
बुलडाणा, गडचिरोली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा समावेश
- व्यंकटेश केसरी
नवी दिल्ली : राज्यातील हिंगोली, जालना, बुलडाणा, गडचिरोली, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे सात जिल्हे शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरले आहेत. मध्यप्रदेशात असे ३९ जिल्हे असून उत्तर प्रदेशातील ४१ जिल्हे शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत.
देशातील चार राज्यांत असे आणखी प्रत्येकी २० हून अधिक जिल्हे आहेत. राजस्थानात ३०, तामिळनाडू २७, गुजरात २० आणि कर्नाटकात २० असे जिल्हे आहेत. रमा देवी आणि हरीश द्विवेदी यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, विद्यापीठ अनुदान आयोगाने विविध निकषांच्या आधारे ३७४ मागास जिल्ह्यांची ओळख निश्चित केली आहे.
शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी उपाययोजना
प्रधान यांनी सांगितले की, शैक्षणिकदृष्ट्या मागास जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याबरोबरच सरकारने देशातील शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. समग्र शिक्षा या उपक्रमासाठी शिक्षण विभाग एक योजना लागू करत आहे. पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे शिक्षण विना विभाजनाचे असावे, असा या योजनेत प्रयत्न आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी याचा उपयोग होईल. विविध पार्श्वभूमी, बहुभाषी गरजा, विविध शैक्षणिक क्षमता लक्षात घेऊन शिक्षणाच्या प्रक्रियेत सक्रिय भागीदारीवर जोर असेल.