पेणमध्ये सात कुटुंबे वाळीत

By Admin | Published: December 1, 2015 01:01 AM2015-12-01T01:01:10+5:302015-12-01T01:01:10+5:30

पेण तालुक्यात गेल्या आठ वर्षांपूर्वी विष्णू म्हात्रे यांच्या घर बांधल्याच्या कारणास्तव संपूर्ण कुटुंबास वाळीत टाकण्याचा प्रकार घडला आहे, तसेच शिंगवटणमधील सुनिता पाटील

Seven families are in distress | पेणमध्ये सात कुटुंबे वाळीत

पेणमध्ये सात कुटुंबे वाळीत

googlenewsNext

अलिबाग : पेण तालुक्यात गेल्या आठ वर्षांपूर्वी विष्णू म्हात्रे यांच्या घर बांधल्याच्या कारणास्तव संपूर्ण कुटुंबास वाळीत टाकण्याचा प्रकार घडला आहे, तसेच शिंगवटणमधील सुनिता पाटील, तसेच इतरांनाही क्षुल्लक कारणास्तव वाळीत टाकण्यात आले आहे. याबाबत गावकीच्या पंच, तसेच इतर ६ जणांविरुद्ध रायगड पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पेण तालुक्यातील बेनेघाट गावातील ग्रामस्थ विष्णू म्हात्रे यानी शिंगणवट गावात घर बांधले यावरून चिडून त्याांना ८ वर्षांपूर्वी वाळीत टाकले. त्यानंतर शिंगणवटमधील सुनिता पाटील या विष्णू म्हात्रेंशी बोलल्या म्हणून त्यांना पाच वर्षांपूर्वी वाळीत टाकले. ममता पाटील (११) ही मुलगी सुनिता यांच्या घरी दूध देण्यासाठी गेली, म्हणून तिच्या सर्व कुटुंबास वाळीत टाकले. गावातीलच संध्या मोहिते याही पाटील कुटुंबाशी बोलल्या, म्हणून त्यांचा मुलगा रूपेश याचे केशकर्तनाचे दुकान दोन वर्षांपूर्वी बंद करण्यात आले . कोणी केस कापण्याकरिता दुकानात गेल्यास त्यासही वाळीत टाकले जाते. गावातील पंकज पाटील याने वाळीत टाकलेल्या ग्रामस्थांशी संबंध ठेवू नये, म्हणून गेल्या चार महिन्यांपूर्वी पोलीस पाटील सचिन कोठावळे यांनी पंकज, त्यांचे वडील व आई यांना जबर मारहाण केली, तसेच वाळीत टाकले. चंद्रकांत पाटील, मारुती पाटील, रूपेश मोहिते यांनाही वाळीतग्रस्तांशी बोलल्याच्या कारणांवरून वाळीत टाकण्यात आले, तसेच रूपेशला मारहाणही करण्यात आली.
सातत्याने मानसिक त्रास दिल्याप्रकरणी शिंगणवट गावकीचे पंच अविनाश कोठावळे, स्वप्निल कोठावळे, कमलाकर पाटील, सतीश पाटील, गोपीनाथ म्हात्रे, परेश कोठावळे आणि अनंत कोठावळे या सात जणांविरुद्ध वाळीतग्रस्त बाळकृष्ण पाटील, शंकर पाटील, मनीराम पाटील, सुनिता पाटील, संध्या मोहिते, मारुती पाटील, चंद्रकांत पाटील व भागुबाई पाटील या सात कुटुंबे प्रमुखांनी शुक्रवारी रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले व रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांच्याकडे लेखी संयुक्त तक्रारी दाखल केल्या आहेत. गावकीचे पंच व पोलीस पाटील सचिन कोठावळे हे गावात दहशत माजवत आहेत. या सर्व प्रकाराबाबत वारंवार वडखळ पोलिसांत तक्रार करूनही कारवाई केली जात नाही. या सर्व प्रकारांबाबत स्वतंत्र गुन्हे दाखल करावेत. जर तत्काळ कारवाई झाली नाही, तर आंदोलन करण्यावाचून पर्याय राहणार नाही, असा निर्वाणीचा इशारा या वाळीतग्रस्त कुटुंबांनी लेखी निवेदनात दिला आहे. (विशेष प्रतिनिधी)

पेण तहसीलदार घेणार समन्वय बैठक
रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले व रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक या उभयतांना भेटून लेखी तक्रार निवेदन दिल्यावर, या अधिकाऱ्यांनी वाळीतग्रस्तांबरोबर चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणी शिंगणवट गावातील या उभय गटांची समन्वय बैठक आयोजित करण्यात येत असून, त्यातून सामोपचाराने हे सामाजिक बहिष्काराचे प्रकरण मिटू शकेल, असे रायगडचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक राजा पवार म्हणाले.

Web Title: Seven families are in distress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.