विदर्भात सात शेतक-यांची आत्महत्या, अकोला दोन, चंद्रपुरात दोन तर गोंदियातील एकाचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 05:02 AM2017-10-21T05:02:51+5:302017-10-21T05:03:46+5:30
नापिकी आणि कर्जापायी विदर्भात दिवाळीच्या दिवशी सात शेतक-यांनी आत्महत्या केली. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील वाठोडा येथे घडली.
यवतमाळ/चंद्रपूर/गोंदिया : नापिकी आणि कर्जापायी विदर्भात दिवाळीच्या दिवशी सात शेतक-यांनी आत्महत्या केली. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील वाठोडा येथे घडली. विशेष म्हणजे हे दोन्ही शेतकरी नात्याने एकमेकांचे व्याही आहेत. तर लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यातही दोन शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले. गोंदिया जिल्ह्यात एका शेतकºयाने गळफास लावला. तसेच अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील वरूड बिहाडे येथील दोन शेतकºयांनी आत्महत्या केली.
वासुदेव विठोबा रोंगे (६७) आणि वासुदेव कृष्णराव राऊत (६५) दोघेही रा.वाठोडा (ता.पांढरकवडा), बंडू बोरकुटे, रा. कोर्धा, जगदीश गोपाळा माटे रा. कोदेपार (ता. नागभीड), तर दुर्योधन वाढवे (३२) रा. सोनेखारी (ता.तिरोडा, जि. चंद्रपूर) अशी मृत शेतकºयांची नावे आहेत.
वाठोडा येथे गुरुवारी वासुदेव रोंगे आणि वासुदेव राऊत हे राऊत यांच्या घरी बसले होते. शेतीवर चर्चा सुरू होती. शेतीने कसा दगा दिला, असे म्हणत या दोघांनीही अचानक एकत्र विष प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच दोघांनाही करंजीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र राऊत यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर रोंगे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दिवाळीच्या दिवशी झालेल्या या घटनेने गावावर शोककळा पसरली. गावात कुणीही दिवाळी साजरी केली नाही. सायंकाळी अंत्यसंस्काराला परिसरातील शेकडो नागरिक आले होते.
वासुदेव रोंगे यांच्याकडे पाच एकर शेती असून त्यांच्यावर ७० हजाराचे कर्ज आहे. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. तर वासुदेव राऊत यांच्याकडे १५ एकर शेती असून खासगी सावकाराचे कर्ज होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, चार मुली असा परिवार आहे. जिल्ह्यात सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयांच्या आत्महत्या होत आहे. परंतु सामूहिक आत्महत्या करण्याची ही पहिलीच घटना आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात कोर्धा येथील यशवंत बोरकुटे यांनी स्वत:च्या शेताजवळील मुरुमाच्या खाणीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. यशवंतवर सेवा सहकारी सोसायटीचे व खाजगी कर्ज होते. ३१ मार्च २०१७ पर्यंत ते थकीत असल्याने त्यांना कर्जमाफी मिळणार नव्हती. त्यांना दीड एकर बरडी शेती आहे. उशिरा रोवणी केल्याने त्यांचा हंगाम निट नव्हता. उत्पन्न नाही. कर्जही माफ झाले नाही. लग्नाची मुलगी आहे. तिचे लग्न कसे करणार, या विवंचनेने ते ग्रासले होते. या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली, असे गावकºयांनी सांगितले. दुसºया घटनेत जगदीश माटे याने घराजवळील विहीरीत उडी घेऊन मृत्यूला कवटाळले. पुरेशा पावसाअभावी पूर्ण पीक सुकून गेले होते. सोसायटीचेही कर्ज होते.
गोंदिया जिल्ह्यात तिरोडा तालुक्यातील सोनेखारी येथे गुरूवारी दुर्योधन चुडामन वाढवे (३२)या शेतकºयाने शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुर्योधनकडे चार एकर शेती आहे. त्याच्यावर जागृती पतसंस्थेचे १ लाख २५ हजार व युनियन बँकेचे ५० हजार आणि सेवा सहकारी संस्थेचे ५० हजार, मायक्रो फायन्सास आणि सावकाराचे ३० हजार असे एकूण ३ लाखांचे कर्ज होते. कर्जाची परतफेड कशी करायची याच विंवचनेत तो मागील काही दिवसांपासून होता. यातून दिवाळीच्या दिवशीच त्याने आत्महत्या केली.
तेल्हारा (अकोला) : तालुक्यातील वरूड बिहाडे येथील ५६ वर्षीय शेतकºयाने सततची नापिकी आणि डोक्यावरील वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून दिवाळीच्या दिवशीच विष प्राशन करून आत्महत्या केली. वासुदेव महादेव बिहाडे यांना गेल्या काही वर्षांपासून शेतीत अपेक्षित उत्पन्न होत नव्हते. अल्प उत्पादनामुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतच त्यांनी १९ आॅक्टोबर रोजी विष प्राशन केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. बिहाडे व त्यांच्या पत्नीचे नावे बँकेचे कर्ज आहे.
दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच येथील अंबादास ठोसर या युवा शेतकºयाने आपली जीवनयात्रा संपविली होती. दिवाळीच्या दिवशीच झालेल्या या दोन आत्महत्यांमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले असा मोठा आप्त परिवार आहे.