वापरापेक्षा सातपट बाष्पीभवन

By admin | Published: April 28, 2015 01:36 AM2015-04-28T01:36:36+5:302015-04-28T01:36:36+5:30

उन्हाचा कडाका वाढल्यामुळे जायकवाडी धरणातील बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. तीन दिवसांपासून दररोज जायकवाडीतील १.१७ दलघमी पाणी बाष्पीभवनाद्वारे हवेत उडून जात आहे.

Seven-fold evaporation | वापरापेक्षा सातपट बाष्पीभवन

वापरापेक्षा सातपट बाष्पीभवन

Next

औरंगाबाद : उन्हाचा कडाका वाढल्यामुळे जायकवाडी धरणातील बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. तीन दिवसांपासून दररोज जायकवाडीतील १.१७ दलघमी पाणी बाष्पीभवनाद्वारे हवेत उडून जात आहे. औरंगाबादसाठी जायकवाडीतून रोज ०.१५ दलघमी पाणी उचलले जाते. त्या तुलनेत बाष्पीभवनाद्वारे हवेत उडून जाणारे पाणी सातपट आहे. परिणामी, जायकवाडी धरणातील उपयुक्त साठा अवघा ९.३५ टक्क्यांवर आला आहे.
पैठण येथील जायकवाडी हे मराठवाड्यातील सर्वांत मोठे धरण आहे. औरंगाबाद व जालना शहरासह सुमारे ४०० लहान-मोठ्या गावांना या धरणातून पाणीपुरवठा होतो. चार ते पाच औद्योगिक वसाहतींनाही जायकवाडीतून नियमितपणे पाणीपुरवठा केला जातो. तसेच मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील सुमारे १ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी जायकवाडीवर अवलंबून आहे.
सध्या जायकवाडीत अवघा ९.३५ टक्केच उपयुक्त साठा शिल्लक आहे. त्यात पुन्हा गेल्या तीन दिवसांपासून बाष्पीभवनाचे प्रमाण कित्येक पट्टींनी वाढले आहे. जलसंपदा कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात बाष्पीभवनाचे दररोजचे प्रमाण हे ०.४० ते ०. ५५ दलघमी होते; परंतु गेल्या तीन दिवसांत त्यात तीनपट वाढ झाली आहे.

बाष्पीभवन थांबविणे शक्य
जायकवाडी धरणाचे पाणलोट क्षेत्र पसरट भांड्यासारखे आहे. त्यामुळे इथे केमिकलद्वारे बाष्पीभवन थांबविणे तेवढे व्यवहार्य ठरणार नाही. त्याऐवजी सेकंडरी स्टोअरेजची कल्पना उपयोगी ठरू शकते. वाल्मीचे माजी महासंचालक सतीश भिंगारे यांनी खूप आधीच शासनाकडे ही कल्पना मांडलेली आहे. रबी हंगामापूर्वी जायकवाडीच्या उपयुक्त साठ्यातील पाणी दुसऱ्या स्वतंत्र खोलगट प्रकल्पात साठवायचे. तो प्रकल्प लहान आणि खोलगट असेल. जेणेकरून तिथे बाष्पीभवनाचे प्रमाण खूप कमी होईल, अशी माहिती जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी दिली.

Web Title: Seven-fold evaporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.