सात ग्रुप अॅडमिनला अटक
By admin | Published: October 15, 2016 04:08 AM2016-10-15T04:08:02+5:302016-10-15T04:08:02+5:30
तळेगाव येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्हॉटस् अॅपच्या
नाशिक : तळेगाव येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्हॉटस् अॅपच्या सात ग्रुप अॅडमिनना अटक केल्याची माहिती नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनॉय चौबे व पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी शुक्रवारी दिली़ सायबर कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सात गावांमधील संचारबंदी शनिवारी दुपारपर्यंत वाढवली आहे. जिल्ह्यात दंगलीचे ४७ गुन्हे दाखल करून १४१ दंगलखोरांना आतापर्यंत अटक केली आहे, तर १०० हून अधिक दंगलखोरांचा शोध सुरू आहे़ जिल्ह्यातील तणाव निवळला असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे.
सिंघल म्हणाले, गुन्हे दाखल केलेल्या ग्रुप अॅडमिनमध्ये शहर परिसरातील अंबड (४), सातपूर (१), गंगापूररोड (३), तर तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत एकाचा समावेश आहे़ दोन समाजांत तेढ निर्माण करणारे, दंगल भडकविण्यास कारणीभूत ठरणारे संदेश, फोटो, व्हिडीओ पाठविणाऱ्या या गु्रप अॅडमिनना अटक करण्यात आली आहे़ अत्याधुनिक सायबर लॅबमार्फत सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यात आले. शुक्रवारी रात्री १२ वाजेनंतर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मोबाईल इंटरनेट सेवा सुरू केली जाणार आहे़ (प्रतिनिधी)