सातशे रुग्णांना मिळाले ‘जीवनामृत’
By admin | Published: July 3, 2015 09:50 PM2015-07-03T21:50:03+5:302015-07-04T00:13:15+5:30
रक्तदान श्रेष्ठ दान : ‘जीवन अमृत’ची सातारा व सिंधुदुर्गच्या यशानंतर राज्यात अंमलबजावणी
जावेद खान - सातारा -राज्य शासनाने सुरू केलेल्या जीवन अमृत सेवेच्या माध्यमातून या दीड वर्षामध्ये जवळपास सातशे रुग्णांना जीवदान मिळाले आहे. शासनाने रोडमॉडेल म्हणून सातारा व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून या सेवेला सुरुवात केली असली तरी रुग्णांच्या हितासाठी ही सेवा आता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली आहे.
खासगी नर्सिंग रुग्णांना तातडीने रक्त मिळत नाही. त्यासाठी त्यांना रक्तदात्याला शोधावे लागते किंवा रक्तपिढीत जाऊन रक्तगट शोधावे लागत होते. त्यामुळे कधी-कधी रुग्णांच्या जीवितासाठी धोका निर्माण होत होता. यासाठी शासनाने रोड मॉडेल म्हणून सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ही योजना प्रथम सुरू
केली. या योजनेअंतर्गत टोल फ्री नंबर ‘१०४’ वर खासगी होम मधील ज्या रुग्णांना रक्ताची आवश्यकता आहे. त्याना जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढी मार्फत शीतसाखळीद्वारे रक्ताची पिशवी पोहोच केली जाते.
या सेवेसाठी रुग्णालयामार्फत एका पिशवीसाठी ८५० रुपये व ५० रुपये सर्व्हिस चार्ज घेतला जातो. साताऱ्यापासून ४० किलोमीटर अंतरापर्यंत ही सेवा सध्या उपलब्ध असून, या सेवेद्वारे अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. म्हणून येत्या काही कालावधीतच जिल्ह्यातील वाई, पाटण, फलटण, खंडाळा, वडूज या तालुक्यांतील ही सेवा सुरू करण्याचा शासकीय रुग्णालयांचा प्रस्ताव आहे. मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता. गतवर्षी जवळ पास ४७५ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला
तर सुरू वर्षी या सहा महिन्यात २११ रुग्णांना रक्त पुरवठा करण्यात
आला आहे. महिन्याला जवळपास ६० ते ७० पिशव्यांची रुग्णालयांना गरज भासते.
अशी मिळते रक्ताची पिशवी
खासगी नर्सिंग होमद्वारे १०४ वर रक्ताची मागणी केल्यानंतर हा कॉल पुण्यातील लॅबमध्ये लागतो. ज्या परिसरातील मागणी आहे. त्या परिसरातील रुग्णालयास संपर्क साधून रक्त गटाची पिशवी घेऊन दुचाकी वाहनावरून संबंधित रुग्णालयापर्यंत पोहोचवली जाते. साधारण तासाभरातच रक्त मिळत असल्याने रुगणाची धावपळ वाचत आहे.
अनेकांची फसगतही...
खासगी नर्सिंगहोम मधून मागणी मिळताच रक्ताची पिशवी घेऊन संबंधित कार्मचारी रुग्णालयात हजर होतो. पण, बऱ्याच वेळा रक्ताची मागणी करणारे रुग्णच तेथे नसल्याने फसगतही होते.
जीवन अमृत सेवेमुळे वेळेत हवा तो रक्तगट उपलब्ध होत आहे. अनेक वेळा रुग्णांना वेळेत रक्त मिळत नसल्याने जीवाला धोक्यात घालावे लागत आहे. परंतु या योजनेमुळे अनेक रुग्णांना जीवदानही मिळाले आहे. त्यामुळे ही सेवा संपूर्ण जिल्ह्यात सुरू करावी. जेणे करून गरजू लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
-विजय जाधव, रुग्ण