रत्नागिरीजवळ अपघातात मुंबईचे सात ठार
By admin | Published: February 9, 2017 05:40 AM2017-02-09T05:40:37+5:302017-02-09T05:40:37+5:30
मुंबईहून गोव्याला निघालेली मोटार फणसाच्या झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात सात तरुणांचा जागीच अंत झाला.
रत्नागिरी : मुंबईहून गोव्याला निघालेली मोटार फणसाच्या झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात सात तरुणांचा जागीच अंत झाला. पालीजवळील खानू येथे बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून, त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत सर्व जण विलेपार्ल्यातील शिवाजीनगर परिसरातील रहिवासी आहेत.
अक्षय शंकर केरकर (चालक, २४, अमोघ सोसायटी), सचिन विश्वनाथ सावंत (३१, नरेशकुंज, भालेकरवाडी), मयूर वामन बेळणेकर (२८, कुलकर्णी चाळ), केदार बंडू तोडकर (२६, जुलेखाबाई चाळ), प्रशांत जगन्नाथ गुरव (३१), वैभव दामोदर मनवे (दोघेही सिद्धिविनायक सोसायटी), निहार सुधाकर कोटियन (चंद्राबाई आश्रम चाळ) अशी मृतांची नावे आहेत.
गोव्याला जाण्यासाठी ते झायलो मोटारीतून रात्री साडेबारानंतर मुंबईहून निघाले होते. खानू बसस्थानकाच्या पुढील बाजूस फणसाच्या झाडावर त्यांची मोटार आदळली व त्यानंतर रस्त्यालगतच्या १० ते १२ फूट खोल गटारात जाऊन कलंडली. ही धडक एवढी भीषण होती की, मोटारीचा चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज एवढा मोठा होता की, काही क्षण महामार्गावर भीषण स्फोट झाल्याच्या अंदाजाने ग्रामस्थ मदतीसाठी धावले. मात्र, भीषणता पाहून त्यांनाही धक्का बसला. चालकाच्या बाजूला बसलेले अभिषेक कांबळी गंभीर जखमी होऊन ओरडत होते. त्यांना ग्रामस्थांनी रुग्णालयात दाखल केले. दरवाजे लॉक झाल्याने क्रेनच्या साहाय्याने कार
महामार्गावर आणून त्यानंतर गॅसकटरच्या साहाय्याने दरवाजे कापून मृतदेह बाहेर काढले. (वार्ताहर)