वाई हत्याकांडातील मृतांचा आकडा थांबेना, संतोष पोळकडून सातव्या हत्येची कबूली
By admin | Published: August 24, 2016 09:54 AM2016-08-24T09:54:23+5:302016-08-24T10:01:07+5:30
क्रूरकर्मा आरोपी डॉक्टर संतोष पोळनं आणखी एक हत्या केली असल्याची म्हणजे सातवा खून केल्याची कबुली दिली आहे
Next
>
- ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 24 - वाई हत्याकांड प्रकरणाने पोलीस प्रशासनासह संपुर्ण महाराष्ट्र हादरुन गेला असताना अजून एक धक्कादायक खुलासा झाला आहे. क्रूरकर्मा आरोपी डॉक्टर संतोष पोळनं आणखी एक हत्या केली असल्याची म्हणजे सातवा खून केल्याची कबुली दिली आहे. संतोष पोळच्या या धक्कादायक माहितीमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. नेमके अजून किती मृतदेह बाहेर निघणार आहेत याचा पोलिसांनाही अंदाज लागेना झाला आहे. पोलीस तपास सुरु असून या प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे.
सहा हत्या करुन क्रूरतेची परिसीमा गाठण-या संतोष पोळने सातव्या हत्येची कबुली दिली आहे. घोटवडेकर रुग्णालयातील वॉर्डबॉय तुषार जाधवचा आपण खून केल्याची आता संतोष पोळने दिली आहे. इंजेक्शन देऊन वॉर्डबॉय तुषार जाधव याची हत्या करण्यात आली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून सातारा जिल्हा रुग्णालयात नेत असतानाच तुषार जाधवचा मृत्यू झाला होता. याच घोटवडेकर रुग्णालयात संतोष पोळ अतिदक्षता विभागात होता.
संतोष पोळने सातवा खून का केला होता याबद्दल पोलीस त्याची चौकशी करत आहेत मात्र अद्याप कारण समजू शकलेलं नाही.
कोल्ड ब्लडेड सीरियल किलर संतोष पोळच्या धक्कादायक खून सत्रात गाजत असलेल्या वाईच्या घोटवडेकर हॉस्पिटलची मंगळवारी सलग पाच तास पोलिसांनी कसून चौकशी केली. पंचनाम्यात आढळून आलेल्या अनेक आक्षेपार्ह वस्तू जप्तही करण्यात आल्या असून, यात काही वैद्यकीय फायली आणि औषधांचा साठा आहे. वाई पोलिसांनी डॉ विद्याधर घोटवडेकर यांचा रुग्णालयाचा काही भाग आणि दवाखान्याचे मेडिकल सील करण्यात आलं. डॉ. संतोष पोळ हा घोटवडेकर हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात गेल्या 8 वर्षापासून काम करत होता.
सिरियल किलर संतोष पोळ याच्या धोममधील घर, फार्म हाऊस, पोल्ट्री फार्म व वाईतील घराची पोलिसांनी झडती घेतली. यावेळी औषधांचा साठा, आक्षेपार्ह कागदपत्रे, सिनेमा सिडीज्, काही दस्तऐवज, दागिने खरेदी केलेल्याच्या पावत्या आणि एक लोखंडी गज त्याच्या घरात सापडला.
साताऱ्याच्या वाईमध्ये मंगल जेधे यांची हत्या करणाऱ्या डॉक्टर संतोष पोळने एकूण 6 जणांची हत्या केल्याची कबुली दिली होती. यामध्ये पाच महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मंगल जेधे, सलमा शेख, नथमल भंडारे, जगाबाई पोळ, सुरेखा चिकणे आणि वनिता गायकवाड अशी हत्या झालेल्यांची नावं आहेत. हत्या झालेले सहाही जण 2003 ते 2016 या कालावधीत सातारा आणि वाई परिसरातून बेपत्ता होते. यापैकी चार मृतदेह हे डॉ. संतोष पोळच्या फार्म हाऊसवर पुरण्यात आले होते.
संतोष पोळ हा बोगस डॉक्टरच
साताऱ्यातील एका महाविद्यालयातून १९९६ मध्ये वैद्यकीय पदवी घेतल्याचे संतोष पोळ हा एकीकडे पोलिसांना सांगत असला तरी ते महाविद्यालय २००६ मध्ये सुरू झाले आहे. त्यामुळे त्याने कोणत्याही महाविद्यालयातून डॉक्टरकीची अधिकृत पदवी घेतली नसून, तो बोगस डॉक्टरच असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने आतापर्यंत ज्या-ज्या हॉस्पिटलमध्ये काम केले आहे, त्या ठिकाणीही पोलिस संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करणार आहेत
‘लोकमत’ने व्यक्त केली होती शक्यता
मंगल जेधे यांच्या खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ‘वाई तालुक्यातून आणखी चार महिला बेपत्ता’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने अजून एक धक्कादायक शक्यता व्यक्त केली होती. ‘या चारजणींच्या बेपत्ता होण्यामागे संतोष पोळच कारणीभूत असावा,’ अशी शक्यताही ‘लोकमत’ने वर्तविल्यानंतर पोलिस यंत्रणाही त्या दृष्टीने अधिक सतर्क झाली होती.
आणखी दोन खड्डे !
संतोष पोळ अतिशय थंड डोक्यानं हत्येचं प्लॅनिंग करायचा. दोन दोन महिने महिलांच्या मागावर असायचा. संतोषचा कबुलीजबाब ऐकून अंगाचा थरकाप उडल्याशिवाय राहात नाही. हत्येच्या दोन महिने आधीच तो मोठे खड्डे खणायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. संतोष पोळने त्याच्या फार्म हाऊसवर आणखी दोन खड्डे खणल्याचे मंगळवारी पोलिस तपासात उघडकीस आले. त्यामध्ये त्याची प्रेयसी ज्योती मांढरे हिचाही तो खून करणार होता. ‘तुझ्या अंगावर व्रण उठले असून, इजेंक्शन दिल्यानंतर ते निघून जातील,’ असे तो तिला सांगत होता. मात्र, तिचा गेम करण्यापूर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी निर्भया कार्यक्रमात दिली. परंतु दुसरा खड्डा त्याने कोणासाठी खणून ठेवला होता, याची माहिती मात्र त्यांनी दिली नाही.
महिलांना एड्सची भीती दाखवून शोषण
महिलांना गुप्तरोग आणि एड्स झाल्याची भीती दाखवून त्यांचं आर्थिक शोषण सुरु करायचा. अर्थातच भीतीचं भांडवलं. डॉक्टरकीच्या नावाखालीच संतोष पोळची सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही उठबस होती. त्यामुळे गावातलं कुणीही संतोषविरोधात बोलायचं धाडस करत नव्हतं. अगदी संतोषच्या वागण्याबोलण्यात संशय जाणवल्यावर सुद्धाही.