दहा दिवसांत राज्यभर पावणेसहा लाख लीटर दारू जप्त
By admin | Published: April 24, 2017 03:03 AM2017-04-24T03:03:23+5:302017-04-24T03:03:31+5:30
महामार्गावर दारूविक्री बंद करण्याच्या अंमलबजावणीनंतर राज्यभरात अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे
जमीर काझी / मुंबई
महामार्गावर दारूविक्री बंद करण्याच्या अंमलबजावणीनंतर राज्यभरात अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पहिल्या दहा दिवसांत जवळपास साडेपाच हजार गुन्हे दाखल करत तब्बल ५ लाख ७१ हजार ३१० लीटर दारू जप्त करण्यात आली आहे.
पोलीस महासंचालकांनी सूचना केलेल्या ‘क्रॅक डाऊन’ मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली. त्यामध्ये दारू बनविणाऱ्या व विक्री करणाऱ्या ४ हजार ७२७ जणांना अटक केली आहे. तर अडीच कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. एप्रिलच्या अखेरच्या दहा दिवसांतही अशाच कारवाईचा धडाका सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार १ एप्रिलपासून महामार्गावर ५०० मीटर अंतरावर दारूविक्रीस बंदी घालण्यात आली आहे. त्याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असल्या तरी पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व आयुक्त, पोलीस अधीक्षकांना आपापल्या घटकांत अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्याची सूचना केली होती. पोलीस ठाण्यातील दैनंदिन काम करत हे ‘आॅपरेशन’ पार पाडून त्याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावयाचा होता. त्यानुसार पहिल्या दहा दिवसांत करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल विविध घटकप्रमुखांकडून मुख्यालयात सादर करण्यात आला आहे.
त्यानुुसार १ ते १० एप्रिलमध्ये राज्यभरातून पोलिसांनी ३ लाख ६२ हजार ७४९ लीटर दारू जप्त केली, तर दोन लाख ८ हजार ५६१ लीटर दारू नष्ट केली आहे. त्यासाठी एकूण ५,४९२ गुन्हे दाखल करून ४ हजार ७२७ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण दोन कोटी ४१ लाख ९८ हजार ३५१ रुपये किमतीचे मद्य ताब्यात घेतल्याचे अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांनी सांगितले. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात आंबेडकर जयंती व अन्य कार्यक्रम असल्यामुळे मोहिमेला स्थगिती दिली होती. आता पुन्हा २० ते ३० एप्रिलपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे, असेही बिहारी यांनी सांगितले.