सात महिन्यांच्या बाळाने खेळता-खेळता गिळला एलईडी बल्ब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 02:00 AM2018-01-25T02:00:56+5:302018-01-25T02:01:09+5:30
चिपळूणमध्ये राहणा-या ७ महिन्यांच्या अरिबाने खेळता-खेळता चुकून एलईडी बल्ब गिळला. पालकांना वाटले की तिने, दोरा किंवा मोबाइलची पिन गिळली असावी.
मुंबई : चिपळूणमध्ये राहणा-या ७ महिन्यांच्या अरिबाने खेळता-खेळता चुकून एलईडी बल्ब गिळला. पालकांना वाटले की तिने, दोरा किंवा मोबाइलची पिन गिळली असावी. त्यानंतर तिला सतत खोकला आणि ताप येऊ लागला. पालक तिला स्थानिक डॉक्टरांकडे घेऊन गेले, पण खोकला कमी होत नव्हता. तिच्या उजव्या बाजूच्या फुप्फुसामध्ये बाह्यघटक असल्याचे तिच्या एक्स-रेमध्ये आढळून आले. त्यानंतर, आठवडाभराने त्यांनी अरिबाला परळ येथील बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयात दाखल केले. त्या वेळी डॉक्टरांनी वेळ न दवडता तपासणी करून ब्लॉन्कोस्कोपीने अगदी दोन मिनिटांत हा बल्ब बाहेर काढला.
परळ येथील वाडिया रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाच्या प्रमुख डॉ. दिव्या प्रभावत यांनी याविषयी सांगितले की, बाह्यघटक बरेच दिवस तिथे राहिल्याने संपूर्ण फुप्फुसामध्ये कणिका उती (उतीचे कण) आढळून आली. हा संसर्ग काढून टाकण्यासाठी इंट्राव्हेनस (थेट नसेमधून) प्रतिजैविके आणि स्टेरॉइड्स देण्यात आली. त्यानंतर, पुन्हा एकदा ब्रॉन्कोस्कोपी केली आणि दोन मिनिटांत हा बाह्यघटक (स्कोपमधून केवळ एक वायर दिसत होती) फोरसेप्सचा वापर करून काढण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे, तो दोन सेंटिमीटरचा एलईडी बल्ब होता.
बल्ब गिळला अन् कळलेच नाही : -
अरिबाने खेळता-खेळता चुकून बल्ब गिळला होता, हे लक्षातच आले नाही. शिवाय, बºयाच स्थानिक डॉक्टरांकडे तपासण्यांसाठी फिरत राहिलो. अखेर वाडिया रुग्णालयात आल्यानंतर डॉक्टरांनी त्वरित निदान करून उपचार केले. त्यामुळे मुलीच्या जिवाचा धोका टळला.
- नौशाद खान (अरिबाचे वडील)
रुग्णालयात सर्वाधिक ब्रॉन्कोस्कोपी : देशातील सर्वाधिक पेडिअॅट्रिक ब्रॉन्कोस्कोपी केल्या आहेत आणि अनेक मोठ्या रुग्णालयांतून या ठिकाणी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कमी कालावधीत, कमी वेदनेसह अनेक लहानग्यांच्या जिवाचा धोका टाळण्यात डॉक्टरांच्या चमूला यश आले आहे. अनेकदा पालक मुलांना खेळायला बारीकसारीक वस्तू देतात. मुले त्या चुकून गिळतात. त्यामुळे अशा वस्तू पालकांनी मुलांना खेळण्यासाठी देणे टाळावे. - डॉ. मिनी बोधनवाला