विदर्भात वीज पडून सात जणांचा मृत्यू
By admin | Published: June 3, 2017 03:52 AM2017-06-03T03:52:33+5:302017-06-03T03:52:33+5:30
विदर्भातील यवतमाळ, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात शुक्रवारी विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस झाला. विविध ठिकाणी वीज कोसळून
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर/पुणे : विदर्भातील यवतमाळ, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात शुक्रवारी विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस झाला. विविध ठिकाणी वीज कोसळून सात जणांचा मृत्यू झाला.
यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोन शेतकरी ठार झाले. पहिली घटना राळेगाव शेतशिवारात तर दुसरी घटना तालुक्यातील वाऱ्हा येथे घडली. वासुदेव मनवर केवटे (५८ रा. राळेगाव) आणि हनुमान बाबूराव चिव्हाणे (५६ रा. वाऱ्हा) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.
वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी भागातील देवडा परिसरात वीज पडून दोन गुराख्यांचा मृत्यू झाला. वसंता बापूराव आत्राम (४३ रा. मांडला) व उकंडराव बापूराव आत्राम (४४ रा. वर्धमनेरी) अशी मृतांची नावे आहेत.
अमरावती जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी आहेत. निशांत धनराजपंत बोके (३०, रा. वरखडे ता. तिवसा), तेजस रुपराव घोटे (२२ रा. मारडा, ता. तिवसा) व बाबूराव विनायकराव देशमुख (५०, रा. देवरा, ता. तिवसा) अशी मृतांची नावे आहेत. तर विवेक मधुकर लांडगे (२२, आखतवाडा, ता. तिवसा), संजय रामचंद्र कोथळकर, छोटू कोथळकर (१५), हिमांशु सोळंके (१५, सर्व, रा. देवरा) हे गंभीर जखमी आहेत. एकाचे नाव समजू शकले नाही. जखमींवर अमरावती येथील इर्विन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
येत्या दोन दिवसात विदर्भ-मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. शुक्रवारी महाबळेश्वर येथेसर्वात कमी १८.४ अंश सेल्सिअस तर, सर्वात जास्त तापमान चंद्रपूर येथे ४२.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
मराठवाड्यात हिंगोली व नांदेड जिल्ह्यात काही भागांत हलका पाऊस झाला.
बुलडाणा येथे वीज पडून शेतात काम करणाऱ्या रुख्मींना भगवान धोंडगे यांचा मृत्यू झाला. चार जनावरेही मृत्युमुखी पडली. तर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातही वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. झुणकाबाई दशरथ ठेलारी (६५) आणि गंगा लाल्या ठाकरे (५५) अशी मृतांची नावे आहेत.