एकाच घरातील सात जण सरणावर होते, समृद्धीवरच्या मृतांना मदत पण...; भास्कर जाधवांची एकनाथ शिंदेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 04:47 PM2023-07-18T16:47:31+5:302023-07-18T16:48:53+5:30
समृद्धी महामार्गावरील मृतांना मदत, मग माझ्या मतदार संघातल्यांना का नाही? उद्धव ठाकरेंसोबत गेलो म्हणून का...
हिवाळी अधिवेशनामध्ये बोलू दिले नाही म्हणून पुन्हा येणार नाही असे सांगणाऱ्या भास्कर जाधवांनी आज विधानसभेत रोखठोक भाषण केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे सरकारवर दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी कोकणातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, मच्छीमारी बांधवांची जमीन, अपघात ग्रस्तांना मदत आदींवर मुद्दे उपस्थित केले. तसेच कोकणाला निधी देताना सापत्नपणाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला.
माझ्या गुहागर मतदारसंघात एकाच कुटुंबातील नऊ जण आणि शेजारचा चालक असे मिळून १० जण अपघातात ठार झाले. समृद्धी महामार्गावर अपघात झालेल्यांना शिंदेंनी मदत जाहीर केली, अन्य ठिकाणच्या मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली. पण सात प्रेते सरणावर असताना शिंदेंनी मला ती खासगी गाडी होती असे सांगत मदत नाकारली. मुंबई गोवा महामार्गावरील हा अपघात होता. २०११ मध्ये काम सुरु झालेले, आजही पूर्ण झालेले नाही. कंत्राटदाराच्या चुकीमुळे म्हातारा म्हातारीची दोन्ही मुले, लेकी, त्यांच्या सुना, त्यांची नातवंडे सगळे जाग्यावर गेले होते. त्यांना मदत करा अशी विनंती केली होती, असे जाधव म्हणाले.
पुण्याला बँजो पार्टीगेलेली १३ माणसे गेली, धर्माधिकारी पुरस्कारात माणसे गेली त्यांना मदत केली, दापोलीत काही दिवसांपूर्वी आठ माणसे गेली त्यांना मदत केली. एका चितेवर सात जणांना अग्नी दिला. सरकार की कोण आहेत, तुमच्याबद्दल वेगळा शब्द वापरला पाहिजे. उदय सामंतांनी मेसेज करून मदत करतोय असे सांगितलेले, असे भास्कर जाधव म्हणाले.
एकनाथ शिंदेवर मी आदरानेच बोलतोय. पण मी उद्धव ठाकरेंबरोबर राहिलो म्हणून असे करायचे, राजकारणासाठी माणसे किती कठोर होतात, किती निष्ठुर होतात, मेलेल्या मनाची होतात, हे यावेळी मला सांगायचे आहे, असे जाधव म्हणाले. यावेळी सत्ताधाऱ्यांच्या बाकावरून जाधव यांच्यावर टोलवा टोलवी सुरु झाली. तेव्हा जाधवांनी सत्ताधाऱ्यांना सात मृतदेहांच्या विषयावर तुम्ही टिंगल टवाळी करताय, असा आरोप केला.