‘सात जणांनी बलात्कार करून जाळले!’

By admin | Published: March 7, 2017 02:35 AM2017-03-07T02:35:42+5:302017-03-07T02:35:42+5:30

दलित महिलेची चित्रफीत ‘व्हायरल’ झाल्याने खळबळ; महिलेचा मृत्यू

'Seven people raped and burned' | ‘सात जणांनी बलात्कार करून जाळले!’

‘सात जणांनी बलात्कार करून जाळले!’

Next

रिसोड(जि. वाशिम), दि. ६- सात इसमांनी बलात्कार करून पेटवून दिल्याची जबानी असलेली एका दलित महिलेची ध्वनिचित्रफीत समाज माध्यमांवर 'व्हायरल' झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सदर महिलेचा सोमवारी दुपारी मृत्यू झाल्यानंतर, तिच्या वडिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन न्यायाची मागणी केली. रिसोड पोलिसांनी आपली फिर्याद नोंदवून न घेता, आरोपींना अभय दिल्याचा आरोप दुर्दैवी पित्याने केला आहे. दरम्यान, रिसोड पोलिसांनी या प्रकरणी १२ फेब्रुवारी रोजी एका इसमाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला असला, तरी अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.
रिसोड पोलिसांकडील नोंदीनुसार, तालुक्यातील मोठेगाव येथील ३२ वर्षीय महिला गत ७ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास घरात झोपलेली असताना, रणजित देशमुख नामक इसमाने घराची कडी वाजवली. महिलेने दरवाजा उघडल्यावर त्याने तिचा विनयभंग केला आणि तिने प्रतिकार केला असता, तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. तिचा पती तिला वागवत नसल्याने ती गत दहा वर्षांपासून दोन मुलांसह वडिलांच्या घरीच राहत होती. पोलिसांनी १२ फेब्रुवारी रोजी रणजित देशमुखच्या विरोधात विनयभंग व जिवे मारण्याच्या प्रयत्नासह, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता; मात्र त्याला अटक करण्यात पोलीस अपयशी ठरले.
सुमारे ६५ टक्के जळालेल्या महिलेला उपचारांसाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या कुटुंबीयांनी ५ मार्च रोजी तिला घरी आणले; मात्र ६ मार्च रोजी दुपारी तिची प्राणज्योत मालवली. त्यानंतर तिच्या वडीलांनी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्याकडे धाव घेऊन, त्यांच्या मुलीवर एकूण सात जणांनी बलात्कार करून तिला पेटवून दिल्याची आणि रिसोड पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केली. त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात, रणजित देशमुखसह देविदास देशमुख नामक इसमाचाही नामोल्लेख केला आहे. इतर पाच आरोपींना मात्र ते ओळखत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, सोमवारपासून समाज माध्यमांवर महिलेची जबानी असलेली ध्वनिचित्रफित फिरत असून, त्यामध्ये ती एकूण सात जणांनी अत्याचार करून जाळल्याचे सांगते. सदर ध्वनिचित्रमुद्रण कुणी केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे पीडित महिलेच्या मृत्यूपूर्व जबानीमध्ये तिने केवळ विनयभंगाचाच उल्लेख केला होता; बलात्कार झाल्याचे म्हटले नव्हते, हे येथे उल्लेखनीय आहे.
दरम्यान, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी लोकमतशी बोलताना, पीडित महिलेच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची ग्वाही दिली. पोलिसांनी सोमवारी महिलेच्या मृत्यूनंतर आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

पीडित महिलेवर अत्याचार झाल्यानंतर कायदेशीररीत्या फिर्याद नोंदविण्यात आली. या घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी आम्ही दोन चमू रवाना केल्या आहेत. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर इतर पाच आरोपींचा निश्‍चितच शोध घेऊ. पीडित महिलेला आम्ही पूर्णपणे न्याय देऊ.
- प्रशांत होळकर
जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम

Web Title: 'Seven people raped and burned'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.