जुलै महिन्यात ‘स्वाइन’चे सात बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 05:32 AM2017-08-07T05:32:01+5:302017-08-07T05:32:12+5:30

शहर-उपनगरात पावसाने दडी मारली असली, तरी पावसाळ्यात उद्भवणारे आजार मात्र बळावले आहेत. यंदा जुलै महिन्यात स्वाइन फ्लूमुळे सात जणांचा बळी गेला असून, काविळीने कुर्ल्यातील २५ वर्षीय सात महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Seven of Swine's victims in July | जुलै महिन्यात ‘स्वाइन’चे सात बळी

जुलै महिन्यात ‘स्वाइन’चे सात बळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शहर-उपनगरात पावसाने दडी मारली असली, तरी पावसाळ्यात उद्भवणारे आजार मात्र बळावले आहेत. यंदा जुलै महिन्यात स्वाइन फ्लूमुळे सात जणांचा बळी गेला असून, काविळीने कुर्ल्यातील २५ वर्षीय सात महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय, मलेरियानेही २ जणांचा मृत्यू ओढावल्याचे दिसून आले आहे.
पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जुलै महिन्यात शहर-उपनगरात गॅस्ट्रोचे १ हजार १० रुग्ण आढळले असून, त्याखालोखाल मलेरियाच्या ७५२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे, जुलै महिन्यात स्वाइन फ्लूचे ४१३ रुग्ण दिसून आले आहेत. जुलै महिन्यात महापालिकेच्या विविध रुग्णालयांत ६५३ डेंग्यूसदृश दाखल रुग्णांची नोंद झाली आहे.
कुर्ला येथे राहणाºया २५ वर्षीय सात महिन्यांच्या गर्भवतीस ७ जुलैपासून ताप आणि मळमळ अशी लक्षणे आढळून आली. तिने खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले व रक्ताच्या तपासणीनंतर काविळीचे निदान झाले. तिला पुढील उपचारांसाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान १३ जुलै रोजी तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे तर मुलुंड येथील ७० वर्षीय महिलेस १५ दिवसांपासून ताप, खोकला, श्वसनास त्रास व घसा दुखणे ही लक्षणे होती. या महिलेस उच्च रक्तदाब व हृदयविकार हे आजार होते. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान १९ जुलै रोजी या महिलेचा मृत्यू झाला आहे.
त्याचप्रमाणे, शिवडी येथील ३३ वर्षीय महिलेला एक महिन्यापासून तिच्या मूळ गावी असताना, ताप, खोकला, श्वासास अडथळा,
घसा दुखणे या प्रकारचा त्रास होता. मुंबईत सरकारी रुग्णालयात तिला दाखल केल्यानंतर, उपचारादरम्यान अखेर तिचा १३ जुलै रोजी मृत्यू झाला.

११ व्यक्तींना स्वाइन फ्लूची लक्षणे

१शिवडी आणि मुलुंड परिसरात आरोग्य केंद्र कर्मचाºयामार्फत ७१६ घरांचे व ३ हजार ६२५ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ११ व्यक्तींना स्वाइन फ्लूसदृश लक्षणे आढळली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय, कुर्ला परिसरात आरोग्य केंद्र कर्मचाºयांमार्फत ३५० घरांचे व १ हजार ६८० लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले.

२त्यात विभागातील फेरीवाल्यांकडील पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले. कुर्ल्यातील २३ फेरीवाले आणि पाच अनधिकृत दुकानांवर कारवाई करून, ७ किलो मिठाई, ५८ किलो खाण्यास अयोग्य अन्नपदार्थ, १८७ लीटर सरबत व पेये, ३२५ किलो बर्फ आणि ३ किलो फळे नष्ट करण्यात आली आहेत.

वाड्यात आढळला स्वाइन फ्लूचा रु ग्ण
वाडा : येथील कुडूस गावी स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शामीम जळगावकर (वय ५८) असे या रुग्ण महिलेचे नाव आहे. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांची तपासणी केली असता त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर पनवेल येथील एका खासगी
रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी.डी. सोनावणे यांच्याशी संपर्क साधला असता शासकीय रुग्णालयात रुग्ण न आल्याने त्याची कल्पना मला नाही, असे त्यांनी सांगितले.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी

घराच्या आसपास, कार्यालयात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्या.
घरातील बांबू प्लांट व मनीप्लांट शक्यतो काढून टाकावेत, अथवा त्यातील पाणी दररोज बदलावे.
घराच्या छतावरील जुने टायर, थर्माकोल, जुने हेल्मेट, शूज इ. काढून टाकावेत.
घराच्या आजूबाजूला पडलेली नारळाची करवंटी, प्लॅस्टिकचे कप-डबे काढून टाकावेत व त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.
फ्रीजचा डीफ्रॉस्ट ट्रे व एअर कंडिशन ट्रे वेळोवेळी स्वच्छ करावा.
पाणी साठविण्याचे ड्रम्स, पिंप व इतर भांडी कपड्याने झाकून ठेवावीत.
व्यक्तिगत स्वरूपाची काळजी घेणे.
घरांच्या खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या लावून घ्याव्यात.
झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.
डास चावू नयेत, यासाठी अंग झाकले जाईल, असे कपडे वापरावेत.
कोणताही ताप, हिवताप, डेंग्यू असू शकतो, म्हणून ताप आल्यास ताबडतोब डॉक्टरांच्या सल्ल्याने पूर्ण औषधोपचार करावेत.

Web Title: Seven of Swine's victims in July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.