जब्याला नागराज देतो महिना सात हजार रुपये!
By Admin | Published: May 17, 2016 03:18 AM2016-05-17T03:18:22+5:302016-05-17T08:07:28+5:30
संसार चालविण्यासाठी वर्षानुवर्षे हलगीवर टाकावी लागणारी थाप आजही त्यांच्या नशिबी आहे
राजा माने,
सोलापूर-गावोगावी होणाऱ्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमात हलगी वाजविणे... संसार चालविण्यासाठी वर्षानुवर्षे हलगीवर टाकावी लागणारी थाप आजही त्यांच्या नशिबी आहे... मोलमजुरी ही देखील आईच्या पाचवीला पूजलेलीच... हे वास्तव चित्र आहे देश-विदेशात गाजलेल्या ‘फॅन्ड्री’चा हीरो जब्या... सोमनाथ लक्ष्मण अवघडे याच्या जीवनाचे !
त्यात आनंदाची बाब म्हणजे सोमनाथ आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी सच्ची धडपड करतोय. इयत्ता दहावी पार करून आता तो कॉलेजला निघण्याच्या तयारीला लागलाय. ‘सैराट’चा यशाचा वारू सैराट सुटलेला असताना त्यावर स्वार झालेला नागराज मंजुळे त्याला दरमहा सात हजार रुपये देऊन मदत करतोय तर त्या जोडीला सोमनाथच्या जीवनातील पालकाची खरी भूमिका वटविणारे करमाळ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा.प्रदीप मोहिते व त्यांच्या पत्नी कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.संगीता मोहिते यांनीही त्याचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी चंग बांधला आहे.
‘सैराट’ अनेक विक्रम नोंदवत असताना ‘फॅन्ड्री’चा हीरो आणि त्याचे कुटुंब आज काय करताहेत हे जाणण्याचा ‘लोकमत’ने प्रयत्न केला. नागराजला फॅन्ड्रीचा हीरो जब्या करमाळा तालुक्यातील केम या छोट्याशा गावात हलगी वाजवणारा सोमनाथ लक्ष्मण अवघडे हा शाळकरी मुलगा सापडला. सोमनाथचे वडील लक्ष्मण पोतराज तर आई जयश्री घरकाम व मोलमजुरी करणारी. हातावरचे पोट असलेल्या या कुटुंबातील सोमनाथ फॅन्ड्रीमुळे रात्रीत जब्याच्या रूपाने हीरो झाला अन् देश-विदेशात पोहोचला. पण त्याचे आणि कुटुंबाचे जीवनमान आहे तेथेच राहिले. आता नागराजचा जब्या गाजला. पण अवघडे कुटुंब मात्र केमच्या गावकुसाबाहेरील आपल्या पत्र्याच्या घरात पूर्वी होते तेच जीवन जगत आहेत. वडील लक्ष्मण यांनी पोतराजाचे काम सध्या सोडले आहे आणि ते हलगी वाजवून चार पैसे कमविण्यात गुंतले आहेत तर आई जयश्री घरकाम आणि मोलमजुरी करीत आहे. सोमनाथ शिकावा, त्याचे व्यक्तिमत्त्व आणखी बहरावे व त्याचे कलाक्षेत्रात नाव व्हावे यासाठी नागराज त्याला आर्थिक मदत करतोय आणि हितचिंतक मंडळीही त्याच्यासाठी पडेल ती जबाबदारी उचलायला तयार आहेत.