विदर्भ, मराठवाड्यात उष्माघाताचे सात बळी
By admin | Published: May 25, 2015 03:31 AM2015-05-25T03:31:11+5:302015-05-25T03:31:11+5:30
उष्णतेच्या असह्य लाटेने होरपळत असलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांत उष्माघाताने आणखी सात जणांचा बळी घेतल्याचे वृत्त आहे
मुंबई : उष्णतेच्या असह्य लाटेने होरपळत असलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांत उष्माघाताने आणखी सात जणांचा बळी घेतल्याचे वृत्त आहे. यामुळे गेल्या आठवडाभरात विदर्भात उष्माघाताने दगावलेल्यांची संख्या ११ वर पोहोचली आहे.
नागपूर येथून आलेल्या वृत्तानुसार उन्हाच्या तडाख्यामुळे गेल्या दोन दिवसांत उपराजधानीत पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात एका खेळाडूचाही समावेश आहे. पोलिसांनी या सर्व मृत्यूंची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असली तरी वैद्यकीय लक्षणांवरून हे सर्वजण उष्माघातानेच दगावल्याचे मानले जात आहे. याआधी गुरुवार, शुक्रवार व शनिवारी विदर्भात पाचजण उष्माघाताने सहाजण मृत्यूमुखी पडले होते.
नागपूरमधील बळींपैकी फक्त राजेश वर्मा या ३२ वर्षीय व्यक्तीचीओळख पटली. याखेरीज गणेशपेठ परिसरात ४५ ते ५० वयोगटातील येका महिलेचा व राणी झाशी चौकात सुमारे ४० वर्षाच्या पुरुषाचा व लकडगंजमध्ये एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. दिक्षितनगर मैदानावर क्रिकेटचा सराव करीत असताना अचानक चक्कर येऊन आदित्यसिंग सयाजीसिंग या २४ वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला.
वाशिमहून मिळालेल्या वृत्तानुसार मंगळूरपीर येथे अनिल राजाराम चव्हाण या पोलीस शिपायाचा उष्माघाताने मृत्यू झाला. मनोरा चौकातील पालिका शाळेजवळ चक्कर येऊन चव्हाण यांच्या डोक्याला जबर मार लागला. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याच्या बसमत तालुक्यात कौठा येथे विठ्ठलराव कल्याणकर (६५) वृद्धाचा असह्य उष्म्याने बळी घेतला. त्यांना ताप भरला व झटके येण्यास सुरुवात झाली. उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)