गॅस लाइन फुटल्याने सात कामगार जखमी
By admin | Published: March 22, 2017 02:44 AM2017-03-22T02:44:24+5:302017-03-22T02:44:24+5:30
गॅस वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना जेसीबीचा फटका लागून गॅस वाहिनी फुटल्याने आग लागल्याची घटना मंगळवारी पहाटे कांजूरमार्ग परिसरात घडली.
मुंबई : गॅस वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना जेसीबीचा फटका लागून गॅस वाहिनी फुटल्याने आग लागल्याची घटना मंगळवारी पहाटे कांजूरमार्ग परिसरात घडली. यात काम करत असलेले ७ कर्मचारी या आगीत जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विक्रोळी आणि कांजूरमार्गच्या मध्यावर असलेल्या गांधीनगर परिसरात मंगळवारी पहाटेपासून घरगुती गॅस वाहिनी दुरुस्तीचे
काम सुरू होते. दरम्यान, जेसीबी मशीनने खोदकाम सुरू असताना अचानक जेसीबीचा फटका लागून गॅस वाहिनी फुटली. काही क्षणांतच मोठी आग लागली. घटनेच्या वेळी या ठिकाणी १० ते १२ कामगार काम करत होते. त्यातील ७ कर्मचारी जखमी झाले. कर्मचाऱ्यांकडून ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र गॅसचा दबाव मोठा असल्याने अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होत होते. अखेर महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मुख्य प्रवाह बंद केल्यानंतर ही आग आटोक्यात आली. पण ही आग विझवत असताना अग्निशमन दलाचे काही जवान जखमी झाले. (प्रतिनिधी)
जखमींची नावे-
या आगीमध्ये रामसिंग राठोड (३१), गजानन जाधव (३२), गजानन पवार (३५), मानस मेहनती (२९), धमेंद्र राय (२५), संदीप गौतम (२३), इंजिनीअर अली (३०) हे सात कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी आणि राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.