सात वर्षांच्या मुलाची १५ लाखांसाठी हत्या

By admin | Published: March 4, 2016 03:42 AM2016-03-04T03:42:51+5:302016-03-04T03:42:51+5:30

पंधरा लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या कल्याणमधील एका व्यापाऱ्याच्या सात वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नयन संतोष जैन असे या मुलाचे नाव आहे

Seven-year-old son killed for 15 lakhs | सात वर्षांच्या मुलाची १५ लाखांसाठी हत्या

सात वर्षांच्या मुलाची १५ लाखांसाठी हत्या

Next

कल्याण : पंधरा लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या कल्याणमधील एका व्यापाऱ्याच्या सात वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नयन संतोष जैन असे या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजेंद्र मोरे, विजय दुबे आणि देशराज कुशवाह या तिघांना अटक केली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी गांधी चौकातील दुकाने बंद ठेवण्यात आली.
गांधी चौकातील गजानन टॉवरमध्ये नयन राहत होता. तो कल्याणनजीकच्या सेक्रेड हार्ट स्कूलमध्ये इयत्ता दुसरीत शिकत होता. त्याचे बुधवारी दुपारी अपहरण झाले होते. तो दुपारी ४च्या सुमारास सोसायटीच्या खाली शाळेच्या बसमधून उतरला. हे आईने घरातून पाहिले. मात्र, त्याच वेळी त्याला त्याच्या वडिलांच्या नयन किड्स या कपड्याच्या दुकानात पूर्वी काम करणारे
दोन कामगार भेटले. त्यांनी नयनला त्यांच्यासोबत मोटारसायकलवरून फिरायला चलण्यास सांगितले. दोघेही ओळखीचे असल्याने तो त्यांच्यासोबत गेला. त्यानंतर, अवघ्या काही मिनिटांत नयनचे वडील संतोष यांना खंडणीसाठी फोन आला. १५ लाख रुपये न दिल्यास नयनला मारण्याची त्यांनी धमकी दिली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी वेगवेगळी पथके स्थापन करून तपास सुरू केला. आरोपींचे फोन ट्रेस केले असता ते वांगणी, मुरबाड परिसरात असल्याचे आढळत होते. त्याआधारे पोलिसांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला.
गुरुवारी सकाळी आरोपींनी संतोष जैन यांना टिटवाळा ते आंबिवलीदरम्यान ट्रेनमधून पैशांची बॅग फेकण्यास सांगितले. पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवून पाठलाग केला. पैसे घेऊन पळणाऱ्या राजेंद्र मोरे आणि विजय दुबे यांना पकडले. त्यांनी नयन जिवंत असून तो मुरबाड येथे तिसरा साथीदार कुशवाह याच्या ताब्यात असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यालाही अटक केली. तेव्हा त्याने नयनला जवळच्या जंगलात लपवल्याचे सांगितले. मुरबाड तालुक्यातील शिवळे गावातील खाटेघर नदीच्या पुलाखाली नयनचा मृतदेह आढळला. कल्याणच्या रु क्मिणीबाई रु ग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. नयनची बुधवारी रात्रीच गळा आवळून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेनंतर कल्याण परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, अपहरणासाठी आरोपींनी वापरलेली मोटारसायकलही संतोष जैन यांचीच आहे. दोन दिवसांपूर्वीच ती चोरीला गेली होती.
>२५ जुलै २००९ला डोंबिवलीतील यश शहा (वय ११) या विद्यार्थ्याचे खंडणीसाठी अपहरण झाले होते. त्याचीही हत्या झाली होती. २७ जुलैला त्याचा मृतदेह बदलापूरजवळ सापडला.
२५ आॅक्टोबर २००९ला प्रिन्स जैन (वय १०) याचे अपहरण झाले. त्याची पोलिसांनी सुखरूप सुटका केली.
२ फेब्रुवारी २०१०ला तुषार सोनी (१२) याचे ५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण झाले. त्याची हत्या झाली. ३ फेब्रुवारीला त्याचा मृतदेह आजदे गावात सापडला.
१७ एप्रिल २०१४ला कल्याणमधील रोहन गुच्छेत (वय १२) याचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण झाले. २१ एप्रिलला कल्याणमधील एपीएमसी मार्केटजवळ एका गोणीत त्याच्या मृतदेहाचे तुकडे आढळले होते.

Web Title: Seven-year-old son killed for 15 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.