सातवा वेतन आयोग देता, मग हमीभाव का नाही?
By admin | Published: March 7, 2016 03:46 AM2016-03-07T03:46:10+5:302016-03-07T03:46:10+5:30
सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देता, त्याबद्दल दु:ख नाही. परंतु अडचणीतील शेतकऱ्यांच्या मालाला सरकार हमीभाव का देत नाही, असा सवाल अभिनेते नाना पाटेकर यांनी येथे उपस्थित केला.
कोल्हापूर : सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देता, त्याबद्दल दु:ख नाही. परंतु अडचणीतील शेतकऱ्यांच्या मालाला सरकार हमीभाव का देत नाही, असा सवाल अभिनेते नाना पाटेकर यांनी येथे उपस्थित केला.
येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व शाहू खासबाग कुस्ती मैदानाचे उद्घाटन पाटेकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात ते म्हणाले, सर्वच पक्षांतील राजकारण्यांनी विश्वासार्हता गमावल्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या नाम फाउंडेशनला सामान्य माणूसही आर्थिक मदत करत आहे. नाना यांनी आपल्या ‘खास शैली’त राजकारण्यांचा समाचार घेत त्यांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते.
पेन, पाण्याची बाटली अशा सर्वच वस्तूंचे दर ठरलेले आहेत; पण शेतकऱ्यांच्या मालाचा भाव निश्चित नाही. परिणामी, तो आर्थिक अडचणीत येत आहे. आपल्या आई-वडिलांच्या आजारपणातील औषधोपचाराचा खर्च तो करू शकत नाही. मुलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात त्याला अपयश येते. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करीत आहे. आई, वडील, दोन लेकरांना मागे सोडून तो गळफास घेतो. बळीराजाला एकाकी वाटत आहे. तो निराश झाला आहे, असे नाना म्हणाले.
अनेक संघर्ष करत मी येथे पोहोचलो आहे. अनेकवेळा फूटपाथवर झोपलोही. १०-१५ रुपयांत दिवस काढले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता अडचणींना सामोरे जावे. आत्महत्या करणे हे षंडपणाचे लक्षण आहे. म्हणून अडचणीतील शेतकऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम नाम फाउंडेशन करीत आहे.
शरद पवार माझे जवळचे मित्र आहेत. बाळासाहेब ठाकरे वडिलांच्या स्थानी आहेत. मात्र, मी कधी हात पसरला नाही. हात पसरले की किमतीचे लेबल लागते अन् मैत्री संपते, असे त्यांनी सांगितले.
सरकार कोणाचेही असो, पहाट आमची होवो, अशी जनतेची अपेक्षा असते. त्यामुळे निवडणुका
झाल्यानंतर सर्व पक्षांच्या नेत्यांची ‘तोंडे’ एकाच बाजूला असावीत. अन्यथा आमचे वाटोळे होते, असा टोला त्यांनी लगावताच हशा पिकला. (प्रतिनिधी)