सत्तर वर्षानंतर हर्णै बंदरात तांबड फुटलं
By admin | Published: December 24, 2015 11:17 PM2015-12-24T23:17:33+5:302015-12-24T23:53:33+5:30
दापोली तालुका : बंदर प्रकाशाने लखलखले; कोट्यवधी रूपयांचे चलन मिळवून देणारे प्रसिद्ध बंदर
शिवाजी गोरे -- दापोली--पारंपरिक हर्णै बंदरात दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या मच्छिची उलाढाल होत असते. या मासेमारी बंदरावर अनेक मच्छिमार कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. पारंपरिक मासेमारी बंदर ७० वर्षाहून अधिक काळ अविरतपणे सुरु आहे. या बंदराला विकासाची प्रतीक्षा असून, गेली अनेक वर्ष अंधारात असणारे बंदर आता प्रकाशमय झाले आहे. हर्णे बंदरात बसवण्यात आलेल्या हायमास्ट लाईटमुळे वर्षानुवर्षे अंधारलेले बंदर प्रकाशमय बनले असून, हर्णै बंदरातील लुकलुकणाऱ्या हायमास्ट दिव्याने बंदरात विकासाचं तांबडं फुटलं आहे.रत्नागिरी जिल्ह््यातील पारंपरिक मासेमारी बंदर म्हणून हर्णै बंदराची ओळख आहे. या बंदरात ताजे मासे, मच्छीचा लिलाव सर्वकाही होते. या बंदरात ताजे मासे खरेदी करण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी होते. या बंदरातील लिलाव हा जिल्ह््यातील मोठे आकर्षण आहे. या बंदरातील लिलाव पाहण्यासाठी दूरदूरचे पर्यटक येतात. हर्णै बंदरातील दीपगृह, सुवर्णदुर्ग किल्ला याचे पर्यटकांना मोठे आकर्षण आहे. असे असले तरीही दुसरीकडे मात्र या बंदरातील पायाभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. हर्णै बंदर पारंपरिक मासेमारी बंदर असून देखील या बंदराकडे शासनाचे दुर्लक्ष होत गेले. या बंदरातील दुरवस्थेमुळे मच्छीमार बांधवांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागते.कोट्यावधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणाऱ्या या बंदरात दररोज दोनवेळा लिलाव होतो. सकाळी ८ ते १० या वेळेत हे बंदर नेहमीच गजबजलेले असते. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत सायंकाळी लिलाव होतो. हर्णै बंदरात लाईट नसल्यामुळे काळोख होण्यापूर्वी घाईगडबडीत लिलाव उरकण्याची वेळ मच्छिमार बांधवांवर येत होती. संध्याकाळी लिलावातील मासे खरेदी करुन विक्रीला मच्छिमार महिला बंदरात बसतात. परंतु, बंदरातील काळोखामुळे अंधार झाला की ग्राहक तिकडे पाठ फिरवतात. त्यामुळे हजारो रुपयांचे मासे खरेदी करणाऱ्या मच्छि विक्रेत्या महिलांचे मोठे नुकसान होत होते. हर्णै बंदरातील अंधारामुळे घाई गडबडीत लिलाव उरकल्यामुळे याचा फटका मच्छि लिलावाला बसत होता. काहीवेळा तर बंदरातील अंधारामुळे मच्छि खरेदी करणे व्यापारी टाळतात. काळोखामुळे रात्री हर्णै बंदर नेहमी अंधारमय असायचे. त्यामुळे याचा फटका हर्णे बंदरातील उलाढालीवरही होत होता.
अंधार दूर : आर्थिक उलाढालीला अडचणी; मच्छिमारांमध्ये समाधान
हर्णै बंदरातील सर्वात मोठी समस्या होती ती म्हणजे विजेची. देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे झाली तरीही कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळणाऱ्या या बंदरातील लाईटकडे दुर्लक्ष केले जात होते. बंदरात वीज नसल्यामुळे लिलावात मासे खरेदी-विक्री त्याचबरोबर आर्थिक उलाढालीला अनेक अडचणी येत होत्या.
- अस्लम अकबाणी
माजी सरपंच
सुमारे पाच लाख रुपये खर्चून हायमास्ट बसवण्यात आले असून, या हायमास्टमुळे बंदरातील अंधाराचे जाळे दूर झाले आहे.
बंदरात येणाऱ्यांनासुद्धा प्रकाशामुळे चांगला फायदा झाला आहे. आता बंदर उशिरापर्यंत सुरु राहू शकते. त्याचा स्थानिक मच्छिमारांना चांगला फायदा होणार आहे.
हर्णैचे माजी सरपंच अस्लम अकबाणी यांनी बंदरातील विजेबाबत वारंवार शासन दरबारी पाठपुरावा केला होता. बंदरात वीज नसल्यामुळे मच्छिमारांची गैरसोय होत असल्याचे राजकीय पुढारी व अधिकारी यांच्या लक्षात आणून दिल्यामुळे हर्णै बंदरात अखेर हायमास्ट दिवे लागले आहेत.
हर्णै गाव आमदार संजय कदम यांनी दत्तक घेतल्यामुळे या बंदरातील विजेबाबत असलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. बंदर जेटीचा विकास प्रलंबित आहे. हर्णै बंदरातील अंधार दूर झाला आहे.