शिवणकाम निविदा प्रक्रिया आटोपली; मात्र कापड पुरवठा नाही

By admin | Published: June 24, 2014 12:47 AM2014-06-24T00:47:42+5:302014-06-24T00:47:42+5:30

आदिवासी आयुक्तस्तरावर यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे २६ जूनला शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे नियोजन करण्यात आले. आयुक्तालयाच्या निर्देशावरून प्रकल्प कार्यालयातर्फे गणवेश

Sewing process tender process; But there is no cloth supply | शिवणकाम निविदा प्रक्रिया आटोपली; मात्र कापड पुरवठा नाही

शिवणकाम निविदा प्रक्रिया आटोपली; मात्र कापड पुरवठा नाही

Next

दिलीप दहेलकर - गडचिरोली
आदिवासी आयुक्तस्तरावर यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे २६ जूनला शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे नियोजन करण्यात आले. आयुक्तालयाच्या निर्देशावरून प्रकल्प कार्यालयातर्फे गणवेश शिवण्याबाबतची ई-निविदा प्रक्रियाही पार पाडण्यात आली. मात्र आयुक्तस्तरावरून गणवेशासाठी कापड पुरवठा अद्यापही करण्यात आला नाही. त्यामुळे या सत्रात सुध्दा जिल्ह्यातील ४७ शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना लवकर गणवेश मिळण्याची चिन्ह दिसेनाशी झाली आहेत.
आदिवासी विकास विभागाच्या नाशिक येथील आयुक्त कार्यालयाच्यावतीने यावर्षी एप्रिल महिन्यात गणवेश पुरवठ्याबाबत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या मागविली होती. पटसंख्येचा अहवाल प्रकल्पस्तरावरून आयुक्त कार्यालयाला पोहोचला. आदिवासी विकास विभागाच्यावतीने आश्रमशाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन गणवेश देण्याची योजना आहे. मात्र विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे पहिले सत्र आटोपल्यानंतरच विद्यार्थ्यांना गणवेश मिळतो ही वस्तुस्थिती आहे. यंदा आश्रमशाळास्तरावर गणवेश शिवून घेण्याचे निश्चित करण्यात आले. कापड पुरवठा नाशिक येथील आयुक्त कार्यालयामार्फत थेट प्रकल्प कार्यालयाला करण्याचे नियोजन होते. यानुसार गडचिरोली प्रकल्प कार्यालयाच्यावतीने १५ दिवसांपूर्वी कापड शिवण्याबाबतची ई-निविदा प्रक्रिया पार पाडण्यात आली. यात गडचिरोली प्रकल्पातील २८ आश्रमशाळांना गणवेश शिवून पुरवठा करावयाचा होता.
यासंदर्भात आदिवासी आयुक्तांची ७ मे रोजी व्हिडीओ कॉन्फरन्स झाली होती. यावेळी त्यांनी प्रकल्प कार्यालयस्तरावर कापड पुरवठा करण्याचे सांगितले होते. १५ ते २५ मे या कालावधीत कापड पुरवठा करण्याचे नियोजन होते. मात्र शाळेची पहिली घंटा वाजायला दोन दिवस राहिले असताना कापड पुरवठाच झाला नाही. यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या तोंडावरच गणवेश मिळण्याची शक्यता वाढली आहे. आदिवासी विभागाच्या अशा ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थी व शिक्षकांची कुचंबणा होत आहे.

Web Title: Sewing process tender process; But there is no cloth supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.